काँग्रेसच्या एका बैठकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर प्रश्नांचा मारा करण्यात आला आहे. बहुधा पहिल्यांदाच राहुल गांधी यांनी अशोक गेहलोत यांना थेट लक्ष्य केले आहे. तसेच अत्यंत स्पष्ट शब्दांत जे काही घडले ते विसरा, यापुढे मनमानी करण्यासारखा मुक्तहस्त मिळणार नसल्याचे राहुल गांधी यांनी गेहलोत यांना सुनावल्याचे समजते.
राजस्थानातील उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यापूर्वी त्यांच्या काही सुचना मान्य करण्यात आल्या, तर अनेक शिफारसींना मंजुरी मिळालेली नाही. बसेरीचे आमदार खिलाडी लाल बैरवा यांचे तिकीट कापणे याचेच एक उदाहरण आहे. सचिन पायलट यांच्या समर्थक आमदाराला उमेदवारी नाकारणे म्हणजे गेहलोत यांची मागणी मान्य केल्यासारखेच आहे.
अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी एकप्रकारे गांधी परिवारालाच आव्हान दिले होते. तर त्यापूर्वी सचिन पायलट यांनी राजस्थान काँग्रेसमध्ये फूट पाडत स्वत:च्या समर्थक आमदारांसह हरियाणा गाठले होते. यामुळे भडकलेले गेहलोत यांनी सचिन पायलट यांना बिनकामाचा, नाकारलेला आणि पाठीत खंजीर खुपसणारा असे संबोधिले होते. अशोक गेहलोत यांचा गांधी परिवारावर मोठा प्रभाव असल्याने सचिन पायलट यांची गांधी परिवारासोबत भेट होण्यापासून देखील त्यांनी रोखले होते. परंतु प्रियांका वड्रा यांच्या पुढाकारावर राहुल गांधी यांनी सचिन पायलट यांची भेट घेतली होती. तसेच त्यांच्या मागण्यांवरून एक समितीही स्थापन केली होती. त्यानंतर तर अशोक गेहलोतच आउट ऑफ नेटवर्कच झाले होते. अनेक महिन्यांपर्यंत गांधी परिवाराचा संदेश पोहोचविण्यासाठी अजय माकन त्यांना फोन करत राहिले, परंतु गेहलोत कॉल रिसिव्ह करत नव्हते, असे बोलले जाते.
काँग्रेस अध्यक्षांकडून निवडणुकीपूर्वी राजस्थानात नेतृत्व बदलाचा प्रयत्न झाला होता, परंतु गेहलोत यांनी तो हाणून पाडला होता. दिल्लीत काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत सोनिया गांधी, राहुल गांधी आणि अशोक गेहलोत यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित हेते. स्वत:च्या समर्थकांना उमेदवारी मिळवून देण्याच्या गेहलोत यांच्या हट्टामुळे राहुल गांधी पूर्वीच त्यांच्यावर चिडले होते. राहुल गांधी यांनी यावेळी गेहलोत यांना तिकिटवाटपातील त्रुटींबद्दल प्रश्न विचारले. गेहलोत यांनी अशा स्थितीत राज्य सरकारवर आलेल्या संकटाची आठवण करुन देण्याचा प्रयत्न केला. परंतु अशोक गेहलोत हे सचिन पायलट यांना पक्षात बाजूला सारून राजस्थान काँग्रेसमध्ये स्वत:चे वर्चस्व निर्माण करू पाहत असल्याची धारणा पक्षश्रेष्ठींची झाली आहे.
भारत जोडो यात्रा आणि मग कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेससाठी व्यूहनीतिकार म्हणून भूमिका बजावणारे सुनील कानुगोलू यांची टीम राजस्थानातही काम करत आहे. कानुगोलू यांच्या टीमने राजस्थानात सक्षम उमेदवारांची यादी तयार केली आहे. जिंकण्याची क्षमता नसलेल्या नेत्याला उमेदवारी दिली जाऊ नये असे काँग्रेस नेतृत्वाने ठरविले आहे. तर राजस्थानविषयी आपण जितके जाणतो, तितके निवडणूक व्यूहनीतिकार जाणत नसल्याचा दावा गेहलोत यांनी केला आहे.
केंद्रीय निवडणूक समितीच्या अलिकडच्या बैठकीत गेहलोत यांच्या सूचनांना महत्त्व मिळत नसल्याचे सांगण्यात आले. गेहलोत यांनी स्वत:चे समर्थक किंवा कुठल्याही आमदार तसेच मंत्र्याला उमेदवारी नाकारण्यात येऊ नये यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. बैठकीत गेहलोत हे अनेक उमेदवारांसाठी आग्रही असताना राहुल गांधी यांनी त्यांना रोखले आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या आमदारांचा मुद्दा राहुल गांधी यांनी उपस्थित केला. तर या आमदारांमुळेच राज्य सरकार वाचल्याचा दावा गेहलोत यांनी केला आहे. अशोक गेहलोत यांच्याबद्दल गांधी परिवाराचा झालेला भ्रमनिरास पाहता पायलट यांच्या समर्थकांना पक्षाकडून मोठा वाव दिला जाण्याची शक्यता आहे. तर गेहलोत यांना पूर्वीप्रमाणे मुक्तहस्त मिळण्याची शक्यता जवळपास संपली आहे.









