(भाग 1)
हल्ली सगळीकडे गल्लीबोळात ठिकठिकाणी मंदिरं दिसतात. ती पाहिल्यानंतर मंदिर आणि व्यापार याचा मनात कुठेतरी संबंध जोडला जातो किंवा पैसे मिळवण्याचा उत्तम मार्ग म्हणूनही मंदिरं बांधली जात असावी, असा एक विचार मनात चटकन येऊन जातो. अशा वेळेला जुनी प्राचीन मंदिरं पाहिली की लक्षात येतं, की मंदिरं बांधण्यामागे काय कारण असावे ते. त्याचा विचार करायला सुरुवात केली, की लक्षात येतं मंदिर ही समाजातील लोकांची प्रतीकं पुजण्याची जागा. पूर्वी मंदिराच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपली जायची. गावांमध्ये एकच देऊळ असायचं. त्या ठिकाणी सर्वजण आपल्या मनातील कल्पना, दु:ख, प्रश्न हे सगळं घेऊन मंदिरापर्यंत पोहोचायचे. या मंदिरामध्ये व्रतवैकल्य दानधर्म सहस्त्रभोजन वेगवेगळ्या ग्रंथांची पारायणं अनुष्ठानं, नृत्य, गायन, वादन, चित्र प्रदर्शन किंवा भव्य रांगोळीची रेखाटनं अगदी आनंदात घडत असत. या प्रत्येक कार्यात गावातल्या प्रत्येकाचा काही ना काही सहभाग असायचा. समाजातील सर्व लोक तिथे एकत्र येत. सगळ्यांच्याच सहवासात तिथे आनंदाने स्तोत्रपठण, पूजा, अर्चना, प्रार्थना, गायन सेवा, कीर्तन, सेवा, महाप्रसाद या सगळ्या गोष्टी अव्याहत चालू असायच्या. परंतु आज या सगळ्या गोष्टींचे मोठे मोठे इव्हेंट होताना आज आपण पाहतोय. अशावेळी हे इव्हेंट पाहिल्यानंतर किंवा पैशांचे आकडे ऐकल्यानंतर असं वाटतं, की या सगळ्या श्रद्धा किंवा याच्या मागचा हेतूच संपत आलाय की काय? पूर्वी तो समाजाला एकत्र बांधून ठेवणारा भाग असायचा. परंतु आता तो समाजाला नफा मिळवण्याचा भाग झालाय. पूर्वीच्या काळी मंदिरांमध्ये यज्ञ याग चालत, लग्नकार्य मौजी बंधन यासारखे विधी एकत्रितरित्या सुद्धा केले जात असत. त्यामागे समाजाला एकत्र आणण्याचा हेतू असायचा. आणि म्हणूनच अशी मंदिरं उद्ध्वस्त करण्याचा हेतू शत्रूच्या मनात असल्याने परकीय आक्रमणात सर्वप्रथम हल्ले मंदिरांवर होताना दिसत.
आमच्या मंदिरांच्या जागा देखील अतिशय सुंदर निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या दिसतात. कुठे नदीच्या संगमाच्या जवळ, तर कधी नदीच्या किनारी, कधी समुद्राची गाज ऐकत ही भव्यदिव्य मंदिरं उभी असायची तर कधी डोंगराच्या कुशीत किंवा डोंगर माथ्यावर ऐटीत उभी असायची. काही मंदिरांच्या जवळ उष्ण पाण्याचे झरे तर काही मंदिरांच्या जवळ नयनरम्य अशा देवराया. म्हणूनच मंदिराच्या सानिध्यामध्ये जंगलं, शेतवाडी, पशुपक्षी, प्राणी, रोपवाटिका, औषधी वनस्पती, पाठशाळा, अनाथाश्रम, वेदाध्ययन केंद्र या सगळ्या गोष्टी एकत्रित सुरू असायच्या. म्हणजेच, मंदिर हे नुसतं पूजेअर्चनेचे स्थान न राहता ते सांस्कृतिक आणि सामाजिक गोष्टींना जोडणारं एक मोठं व्यासपीठाच असायचं.








