तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचा आरोप : अॅपल हॅकिंग अलर्ट प्रकरण
वृत्तसंस्था/ चेन्नई
अॅपल कंपनीकडून अलर्ट मिळाल्यापासून विरोधी पक्ष केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत. शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी, काँग्रेस खासदार शशी थरूर, तृणमूल खासदार महुआ मोइत्रा, आप खासदार राघव चड्ढा समवेत विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांना अॅपल कंपनीकडून फोन हॅक होण्याची शक्यता असल्याचा अलर्ट मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुक अध्यक्ष एम.के. स्टॅलिन यांनी मोदी सरकार मोबाइल कंपनीला धमकावित असल्याचा आरोप केला आहे.
भाजप सरकार प्राप्तिकर विभाग, ईडी, सीबीआय यासारख्या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहे. फोन टॅपिंगचा प्रकार सध्या सुरू आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या तक्रारीनंतर केंद्र सरकारने अॅपल कंपनीला धमकी दिली आहे. भाजप 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये पराभूत होणार असल्याचे कानावर आले आहे. सर्वांनी एकत्र येत इंडिया आघाडीला विजय मिळवून द्यावा असे आवाहन करत असल्याचे स्टॅलिन यांनी यावेळी केले आहे.
अॅपल कंपनीकडून हा अलर्ट केवळ विरोधी पक्षांच्या नेत्यांनाच का आला? हा एक गंभीर मुद्दा आहे. सरकारच्या वतीने मंत्र्यांनी केलेला युक्तिवाद अत्यंत कमकुवत होता. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणाची दखल घ्यावी अशी मागणी राजद खासदार मनोज झा यांनी केली आहे.
विरोधी पक्षांच्या या नेत्यांनी यापूर्वी अनेकदा हॅकिंगचे आरोप केले आहेत. काही वर्षांपूर्वीही त्यांनी हाच प्रयत्न केला होता. तेव्हा न्यायालयाच्या देखरेखीत आम्ही पूर्ण तपास करविला होता. परंतु विरोधकांचे आरोप धादांत खोटे ठरले होतो असे केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.









