सरकारकडून आकडेवारी जारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतात रस्तेदुर्घटनांमधील बळी हा चिंतेचा मोठा विषय आहे. रस्ते दुर्घटनांमुळे दरवर्षी लाखो लोकांना जीव गमवावा लागतो. यातील बहुतांश मृत्यू हे ओव्हर स्पीड ड्रायव्हिंगमुळे होतात. 2022 मधील रस्ते दुर्घटनांमध्ये झालेल्या प्रत्येकी 10 मृत्यूंपैकी 7 मृत्यूंसाठी भरधाव वेग कारणीभूत ठरला होता. एका वर्षात रस्ते दुर्घटनांमध्ये 1,68,491 जणांचा मृत्यू झाला असून 4 लाख लोक जखमी झाले आहेत. यातील 2 लाख लोक हे गंभीर जखमी झाले होते.
याचबरोबर वाहतूक नियमांचे उल्लंघन करत राँग साइड ड्रायव्हिंग देखील मृत्यूचे दुसरे सर्वात मोठे कारण ठरले आहे. तर सुरक्षा उपकरण म्हणजेच सीट बेल्ट आणि हेल्मेटचा वापर न केल्यामुळे 67 हजार लोकांना स्वत:चा जीव गमवावा लागला आहे. रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाकडून ही आकडेवारी जारी करण्यात आली आहे.
हेल्मेट न परिधान केल्याने 50 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला तर याहून दुप्पट संख्येत लोक जखमी झाले आहेत. यातील 35,692 लोकांचा मृत्यू दुचाकी चालविताना तर 14,337 लोकांचा मृत्यू बाइकवर मागे बसण्यादरम्यान झाला आहे. अशाचप्रकारे 16,715 लोकांचा मृत्यू सीटबेल्ट न घातल्याने झाला आहे. 42,300 लोक अशा प्रकरणांमध्ये जखमी झाले आहेत.
2022 मध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लाखो रस्ते दुर्घटनांची नोंद झाली आहे, यातील बहुतांश प्रकरणांमध्ये जीवितहानी झाली असून लोक जखमी देखील झाले आहेत. 2021 पेक्षा अधिक दुर्घटनांची नोंद 2022 मध्ये झाली आहे. मागील 5 वर्षांमध्ये रस्ते दुर्घटना आणि त्यातील बळींचे तुलनात्मक विश्लेषण केले असता भरधाव वेगामुळे अधिक संख्येत बळी जात आहेत.









