प्रहार संघटनेचे अध्यक्ष सुनील बागडे यांनी केली तोडफोड
जत, प्रतिनिधी
जत तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याचा जिल्हाधिकारी यांनी अहवाल देऊन देखील जत तालुक्याचे नाव दुष्काळी यादीतून वगळलेच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या प्रहार संघटनेचे अध्यक्ष सुनील बागडे यांनी शासनाचा निषेध व्यक्त करत तहसीलदार यांच्या गाडीची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. सकाळी अचानक घडलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
जत तालुक्यात यावर्षी सरासरी पेक्षाही अत्यल्प पाऊस झाला आहे. खरीप पाठोपाठ रब्बी हंगाम देखील पूर्णता वाया गेला आहे. तीस गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहेत. जनावरांच्या चाऱ्याची देखील भीषण टंचाई निर्माण झाली आहे. द्राक्ष, डाळिंब यासारखी बागायती पिके देखील शेतकऱ्यांच्या हातून निघून गेल्याने तालुक्यावर गंभीर परिस्थिती ओढवली आहे. साठवण तलाव कोरडे ठाक पडले आहेत. दीपावली नंतर पुन्हा तालुक्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून भूगर्भातील पाण्याची पातळी झपाटट्याने खालावत आहे.
एकीकडे अशी वास्तव परिस्थिती असताना सुद्धा जतचा दुष्काळी यादीत समावेश होऊ शकला नाही. या पार्श्वभूमीवरच 27 ऑक्टोबर रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व पक्ष , संघटना यांनी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांनी जतच्या बाबतीत सकारात्मक अहवाल पाठवला होता. पालकमंत्री सुरेश खाडे यांनी देखील जत तालुका दुष्काळ होईल अभिवचन दिले होते. त्यानंतर सुद्धा राज्य सरकारने दुष्काळी यादीत समावेश केला नाही.
याचा निषेध नोंदवत बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास प्रहार संघटनेचे अध्यक्ष सुनील बागडे हे एकटेच हातात स्टिक घेऊन तहसील कार्यालयाच्या आवारात घुसले. त्यांनी शासनाचा निषेध व्यक्त करत जत तहसीलदार यांची शासकीय गाडी चारही बाजूनी फोडली. यात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना समजताच तहसील आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.