हातातेंडाशी आलेले भातपीकही धोक्यात : दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर आस्मानी संकट
खानापूर : तालुक्यात दुसऱ्या दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मंगळवारी सायंकाळी पाचनंतर दमदार पाऊस झाला असून शेतकऱ्यांचे या पावसामुळे नुकसानच होणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेले भातपीकही वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. माळरानावरील भातपीक शेतकऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासून कापण्यास सुरुवात केली आहे. मात्र अचानक सुरू झालेल्या पावसामुळे आलेले भातपीकही पावसात भिजून वाया जाण्याचा धोका निर्माण झाल्याने दुष्काळाशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर आस्मानी संकट कोसळले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यंदाच्या खरीप हंगामात पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने सर्वच पिके सुकून गेली आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पाणी लावून भातपीक वाचवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सरासरीच्या 50 टक्के भातपीक वाया गेले आहे. शेतकऱ्यांनी दुष्काळाशी सामना करत काही ठिकाणी भातपीक जगवण्याचा प्रयत्न केला होता. हे भातपीक कापण्याचा हंगाम सुरू झाला होता.
पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून वाचवलेले भातही गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वाया गेले आहे. या पावसामुळे शेतात कापलेले भात भिजून गेले आहे. त्यामुळे चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. यावर्षी पावसाने पूर्णपणे पाठ फिरविल्याने ऊस, भुईमूग, भात यासह इतर सर्वच पिके कडक उन्हामुळे करपून गेली आहेत. ऊस पिकाचेही पाऊस नसल्याने वाढ झालेली नाही. त्यामुळे यावर्षी सरासरीपेक्षा 50 टक्के ऊस पीक कमी मिळण्याची शक्यता शेतकऱ्यांनी बोलून दाखविली आहे. भुईमूग पीक पूर्णपणे वाया गेल्याने काही शेतकऱ्यांनी भुईमूग काढण्याचेही टाळले आहे. तर उरलेसुरले भातपीक जंगली जनावरांपासून वाचवण्यासाठी रात्रीचा दिवस करून शेतकरी भातपीक वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. जंगली जनावरांकडून भात पिकाचा फडशा उडवला जात आहे. आणि अशा परिस्थितीत गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. हा पाऊस पुढील दोन-चार दिवस राहिल्यास पाणथळ जमिनीतील भातही वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. सुरुवातीला पाऊस नसल्याने पिके करपून गेली. आणि आता हातातोंडाशी आलेले पीकही होत असलेल्या पावसाने वाया जाणार असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे.









