सध्याच्या घडीला सहयोगी संघांचा विचार केला तर अफगाणिस्तान संघ प्रचंड दमदार संघ आहे. एखाद्या चांगल्या संघाकडून ज्यावेळी आपण पराभव स्वीकारतो, त्यावेळी क्रिकेटचे चाहते मोठ्या मनाने पराभव स्वीकारतात. परंतु ज्यावेळी अफगाणिस्तानसारख्या संघाकडून इंग्लंड, पाकिस्तान यासारख्या संघांचे पानिपत होणं म्हणजे ज्याने तुम्हाला क्रिकेटचे बाळकडू दिले त्यांनाच आसमान दाखवण्यासारखे झालं.
क्रिकेट या खेळासाठी पाकिस्तानने खऱ्या अर्थाने मदत केली होती. पाकिस्तानने त्यांना क्रिकेट बोर्ड स्थापन करून दिले. दुसऱ्या बाजूने त्यांनी भारताचे शतश: आभार मानले पाहिजेत. आयपीएलचे दरवाजे भारताने त्यांच्यासाठी सताड उघडे केले होते. अर्थात त्याचा प्रचंड फायदा या स्पर्धेत झाला, हे सत्य नाकारून चालता येणार नाही. भारतीय खेळपट्ट्यांवर अफगाणिस्तानची ताकद मोठी आहे, ज्या प्रकारच्या खेळपट्ट्या त्यांना अपेक्षित होत्या, नेमक्या तशाच खेळपट्ट्या त्यांना मिळाल्या. असो.
अफगाणिस्तान संघ आता क्रिकेटमध्ये परिपक्व संघ बनू पाहतोय. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर म्हणतो की अफगाण संघाला ही विश्वचषक स्पर्धा एक अविस्मरणीय स्पर्धा करण्याची संधी आहे. कुठल्याही मोठ्या सोयीसुविधा नसताना, त्यांनी केलेली ही नेत्रदीपक कामगिरी निश्चितच डोळ्यात खुपणारी. दुसरीकडे अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू रशीद खानने भारतीय खेळाडूंचे भरभरून कौतुक केले. आमचा भारताविरुद्ध पराभव झाल्यानंतरसुद्धा विराट, रोहितने ड्रेसिंग रूममध्ये येऊन मोलाचा कानमंत्र दिला होता. हा मोलाचा सल्ला आम्ही लंकेविरुद्धच्या सामन्यात फॉलो केला आणि बघता बघता आम्ही विजयाच्या समीप पोहोचलो.
विश्वचषक स्पर्धा सुरू होण्याअगोदर अफगाणिस्तान, नेदरलँड्ससारख्या लिंबू टिम्बू संघामुळे स्पर्धेची रंगत कमी होते, असे काही जाणकारांचे मत होते. किंबहुना त्यांच्याविरुद्धचे सामने म्हणजे प्रतिस्पर्धी संघाला दोन गुण निश्चित, हेच समीकरण सर्वसाधारण होते. पण काय घडलं ते आपण बघत आहात ना! ज्या अफगाणिस्तानकडे आत्ताच्या घडीचा सर्वोत्कृष्ट फिरकी मारा असून सुद्धा सर्वजण त्यांच्याकडे दुय्यम संघ म्हणूनच बघत होते. परंतु याच अफगाणिस्तानने प्रथम मागील विश्वविजेत्या इंग्लंडला, त्यानंतर 1992 च्या विश्वविजेत्या पाकिस्तानला, तर काल परवा 1996 च्या विजेत्या श्रीलंकेला पराभवाचा धक्का देत सर्वांना आश्चर्यचकित केलं. त्यांचे नाणं किती खणखणीत वाजते हे या तीन दिग्गज देशाविरुद्धच्या विजयावरून दिसून येईल. आणि अर्थातच आम्हीही सुपर फोरच्या शर्यतीत आहे हे त्यांना वेगळे सांगण्याची आवश्यकता भासली नाही. आम्हीच बब्बर शेर आहोत, हे त्यांनी तीन दिग्गज देशांविरुद्ध दाखवून दिलं.
स्पर्धेअगोदर क्रिकेटच्या चाहत्याने जर अफगाण संघ तीन मोठे विजय मिळवतील असे भाकित केले असते तर क्रिकेट विश्लेषकाने त्यांना मूर्खात काढले असते. अफगाणिस्तानचा एखादा विजय आपण फ्लूक (अंधेरे मे तीर लगना) समजू शकतो. पण एकदम नवे तीन-तीन विजय. ही कामगिरी निश्चितच अतुलनीय, नेत्रदीपक. त्यांच्या प्रमुख फलंदाज, गोलंदाजांना महत्त्वपूर्ण सामन्यात मिळालेला सूर निश्चितच त्यांच्यासाठी सुखावह. असो. असा हा अफगाणिस्तानचा संघ विश्वचषक स्पर्धेत इतिहास रचू पाहतोय. उर्वरित तीन सामन्यात तीन खळबळजनक विजय मिळवले तर त्यांच्यासाठी उपांत्य फेरीचा दरवाजा फार दूर नाही. एकेकाळी कुबड्या घेऊन फिरणारा हा अफगाणिस्तानचा संघ या विश्वचषक स्पर्धेत भल्याभल्यांना पाणी पाजतोय. चांगल्या चांगल्या संघांना त्यांनी व्हेंटिलेटरवर ठेवलंय. अफगाण म्हटलं की पठाण आलेच. आणि पठाण म्हटलं की पठाणी व्याज आलेच, या पूर्ण विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानने प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध खेळताना पठाणी व्याजासहित मुद्दल वसूल केलं आहे, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये एवढं मात्र खरं! असो. उर्वरित तीन सामन्यांत अफगाणिस्तानचा संघ आणखी कोणा कोणाला बेचिराख करतोय हे बघणं औत्सुक्याचे ठरणार आहे. तूर्तास अफगाणिस्तानला सलाम!
क्रिकेट समालोचक विजय बागायतकर









