वृत्तसंस्था/ कोलकाता
भारतीय क्रिकेट संघातील अनुभवी आणि ज्येष्ठ फलंदाज विराट कोहलीचा 35 वा वाढदिवस बंगाल क्रिकेट संघटनेतर्फे (कॅब) मोठ्या थाटात साजरा केला जाणार आहे.
सध्या सुरू असलेल्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत यजमान भारताचा दक्षिण आफ्रिका बरोबरचा सामना कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानावर 5 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या सामन्यावेळी बंगाल क्रिकेट संघटनेने कोहलीचा वाढदिवस ‘विराट’ पद्धतीने साजरा करण्याची योजना आखली आहे. या सामन्यावेळी सुमारे 70 हजार शौकिनांना मोफत कोहली मास्कचे वाटप केले जाणार आहे. या सामन्याची सर्व तिकीटे यापूर्वीच विकली गेली आहेत. या सामन्यातील खेळाला सुरूवात होण्यापूर्वी बंगाल क्रिकेट संघटनेतर्फे मैदानात केक कापला जाईल. तसेच कोहलीचा बंगाल क्रिकेट संघटनेतर्फे स्मृतीचिन्ह देऊन गौरव केला जाणार आहे. 5 नोव्हेंबर हा दिवस विराटच्या दृष्टीने खास महत्त्वाचा असल्याचे बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष स्नेहाशिष गांगुली यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानावर 2013 च्या नोव्हेंबर महिन्यात सचिन तेंडुलकरने आपली 199 वी कसोटी खेळली होती त्यावेळीही या मैदानावर शौकिनांनी सचिनला शुभेच्छा देण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.









