वृत्तसंस्था/ जोहोर बेहरू (मलेशिया)
सुल्तान जोहोर चषक पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत भारतीय पुरूष हॉकी संघाने न्यूझीलंडचा 6-2 अशा गोलफरकाने पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. या सामन्यात भारतीय संघातील अमनदीप लाक्राने शानदार हॅट्ट्रीक नोंदविली.
या सामन्यात अमनदीप लाक्राने 2 ऱ्या, 7 व्या आणि 35 व्या मिनिटाला असे 3 गोल नोंदवून हॅट्ट्रीक साजरी केली. भारतीय संघातील अरुण सहानीने 12 व्या आणि 53 व्या मिनिटाला असे दोन गोल नोंदविले. पुवन्ना चंदूरा बॉबीने 52 व्या मिनिटाला 1 गोल केला. न्यूझीलंडतर्फे लुक अॅल्ड्रेडने 29 व्या आणि 60 व्या मिनिटाला असे 2 गोल केले.
या सामन्याला भारतीय संघाने पहिल्या मिनिटापासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता. भारतीय संघाला पहिल्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. आणि अमनदीप लाक्राने या संधीचा फायदा घेत भारताचे खाते दुसऱ्या मिनिटाला उघडले. यानंतर न्यूझीलंड संघावर भारतीय संघाने दडपण ठेवण्यास सुरूवात केली. 7 व्या मिनिटाला भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. व अमनदीप लाक्राने वैयक्तिक आणि संघाचा दुसरा गोल केला. 12 व्या मिनिटाला अरुण सहानीने मैदानी गोल करून भारताची आघाडी वाढवली. मध्यंतराला 1 मिनिट बाकी असताना न्यूझीलंडच्या अॅल्ड्रेडने गोल नोंदवून भारताची आघाडी थोडी कमी केली. मध्यंतरावेळी भारताने न्यूझीलंडवर 3-1 अशी आघडी घेतली होती.
सामन्याच्या उत्तरार्धाला प्रारंभ झाल्यांनतर लाक्राने संघाचा चौथा तर वैयक्तिक तिसरा गोल नोंदविला. आघाडी फळीतील उत्तमसिंगने दिलेल्या पासवर लाक्राने हा गोल केला. या सामन्यातील शेवटच्या 15 मिनिटांच्या कालावधीत 3 गोल नोंदविले गेले. 52 व्या मिनिटाला पुवन्ना चंदूरा बॉबीने पेनल्टी कॉर्नरवर भारताचा पाचवा गोल केला. 53 व्या मिनिटाला सहानीने भारताचा सहावा आणि शेवटचा गोल केला. 60 व्या मिनिटाला अॅल्ड्रेडने न्यूझीलंडचा आणि वैयक्तिक दुसरा गोल नोंदविला पण भारताने हा सामना 6-2 अशा गोलफरकाने जिंकून उपांत्य फेरीत स्थान मिळविले.









