निवडणूक प्रतिज्ञापत्रामुळे झाला खुलासा : घटस्फोट झाल्याचे केले नमूद
वृत्तसंस्था/ दौसा
राजस्थानमधील काँग्रेस नेते सचिन पायलट आणि सारा अब्दुल्ला यांचा घटस्फोट झाला आहे. पायलट यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातून याबाबतचा खुलासा झाला आहे. सारा अब्दुल्ला या जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ल यांच्या कन्या आहेत. सचिन पायलट आणि सारा यांचा विवाह 2004 साली झाला होता.
25 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज प्रक्रिया 30 ऑक्टोबर रोजी सुरू झाली होती. सचिन पायलट यांनी मंगळवारी टोंक विधानसभा मतदारसंघाकरता स्वत:चा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात ते घटस्फोटित असल्याचे नमूद आहे.
सचिन पायलट आणि सारा अब्दुल्ला यांना आरन आणि विहान ही दोन मुले आहेत. प्रतिज्ञापत्रात सचिन पायलट यांनी दोन्ही मुले स्वत:वर अवलंबून असल्याचे म्हटले आहे. 2018 मधील प्रतिज्ञापत्रात पायलट यांनी सारा अब्दुल्ल यांच्या संपत्तीचा तपशील नमूद केला होता, परंतु यावेळच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीचा तपशील नाही.
सारा अब्दुल्ला आणि सचिन पायलट हे अमेरिकेत शिक्षण घेत असताना संपर्कात आले होते. सचिन पायलट हे अमेरिकेच्या पेंसिलवेनिया युनिव्हर्सिटीच्या व्हॉर्टन स्कूलमधून एमबीए करण्यासाठी गेले होते. तेथेच त्यांची भेट सारा अब्दुल्लांसोबत झाली होती. त्यानंतर ते परस्परांच्या प्रेमात पडले होते. सचिन हे पुढील शिक्षणासाठी दिल्लीत परतले होते. तर सारा या शिक्षणासाठी अमेरिकेतच थांबल्या होत्या. त्या काळातही दोघेही ईमेल आणि फोनवरून संपर्कात होते.
दोघांनी सुमारे तीन वर्षांपर्यंत डेट केल्यावर स्वत:च्या कुटुंबीयांना प्रेमाच्या नात्याची कल्पना दिली होती. हा एक आंतरधर्मीय विवाह असल्याने दोघांचेही कुटुंबीय तयार झाले नव्हते. सचिन पायलट हे स्वत:च्या कुटुंबीयांची समजूत काढण्यास यशस्वी ठरले होते. अखेर 2004 साली दोघांनी विवाह केला होता, परंतु या विवाहसोहळ्यात अब्दुल्ला कुटुंब सामील झाले नव्हते. परंतु पुढील काळात अब्दुल्ला कुटुंबाने देखील सचिन आणि सारा यांच्या नात्याचा स्वीकार केला होता.









