तृणमूल खासदारावर गंभीर आरोप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कॅश फॉर क्वेरी प्रकरणी 2 नोव्हेंबर रोजी लोकसभेच्या शिष्टाचार समितीसमोर हजर राहणार असल्याची माहिती तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी मंगळवारी दिली आहे. याचदरम्यान मोइत्रा यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्याकडून करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. बनावट आरोप सिद्ध करण्यासाठी भाजपकडे कुठलाच पुरावा नसल्याचा दावा मोइत्रा यांनी केला आहे.
यापूर्वी महुआ मोइत्रा यानी लोकसभेच्या समितीसमोर हजर राहण्यासाठी वाढीव मुदत मागितली होती. कॅश फॉर क्वेरी प्रकरणी झालेल्या आरोपांप्रकरणी बाजू मांडण्यासाठी मोइत्रा यांना यापूर्वी 31 ऑक्टोबर रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले होते.
खासदार मोइत्रा यांच्यावर भेटवस्तू आणि पैशांच्या बदल्यात संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप आहे. मोइत्रा यांनी पैसे स्वीकारून एका उद्योजकाच्या विरोधात प्रश्न विचारले असल्याचा आरोप भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून केला आहे. या आरोपामुळे महुआ मोइत्रा यांचे संसद सदस्यत्व संकटात सापडले आहे.
अदानी समुहाला मी वारंवार लक्ष्य केल्याने आता मला टार्गेट केले जात असल्याचा दावा मोइत्रा यांनी केला आहे. महुआ मोइत्रा यांनी लोकसभेत आतापर्यंत 61 प्रश्न विचारले असून यातील 50 प्रश्न अदानी समुहावर आधारित असल्याचे खासदार दुबे यांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.









