आप नेत्या आतिशी यांनी व्यक्त केली भीती : मग झारखंड, केरळ, तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचा नंबर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2 नोव्हेंबर रोजी ईडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली जाऊ शकते असा दावा आप नेत्या आणि दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी केला आहे. केजरीवाल यांच्यानंतर इंडिया आघाडीतील अन्य नेत्यांनाही अटक होणार आहे. पुढील नंबर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा असल्याचा दावा आतिशी यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अरविंद केजरीवाल यांची भीती वाटतेय. निवडणुकीत आम आदमी पक्षाला पराभूत करू शकत नसल्याची भाजपला जाणीव आहे. याचमुळे आप नेत्यांना एक एक करून तुरुंगात डांबले जात आहे. याचबरोबर राजकीयदृष्ट्या बलवान दिसून येत असलेल्या इंडिया आघाडीच्या नेत्यांनाही लक्ष्य करण्यात येत असल्याचा दावा आतिशी यांनी केला.
दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. यानंतर काही तासातच ईडीने समन्स जारी करत अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी 2 नोव्हेंबर रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. याच दिवशी केजरीवाल यांना अटक होणार असल्याचे आतिशी यांचे म्हणणे आहे.
अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून 30 ऑक्टोबर रोजी केजरीवाल यांना पहिला समन्स बजावण्यात आला आहे. यापूर्वी सीबीआयने केजरीवाल यांची एप्रिल महिन्यात साडेनऊ तासांपर्यंत चौकशी केली होती. दिल्लीत अबकारी धोरण घोटाळाच झाला नसल्याचा दावा केजरीवाल यांनी केला होता. या घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आप खासदार संजय सिंह सध्या तुरुंगात आहेत.
सिसोदिया 247 दिवसांपासून तुरुंगात
मनीष सिसोदिया यांना या घोटाळ्याप्रकरणी 26 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. याप्रकरणी 247 दिवसांपासून तुरुंगात असलेल्या सिसोदिया यांना जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सिसोदिया यांच्यावर भ्रष्टाचार आणि मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे.









