पाक सरकारने दिलेली मुदत समाप्त
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानात अवैध स्वरुपात वास्तव्य करत असलेल्या सुमारे 17 लाख अफगाण नागरिकांसमवेत सर्व शरणार्थींसाठी स्वैच्छिक स्वरुपात देशाबाहेर पडण्याची मुदत मंगळवारी समाप्त झाली आहे. यामुळे पाकिस्तान सरकारकडून अफगाण शरणार्थींना देशाबाहेर काढण्याची प्रक्रिया आजपासून सुरू केली जाणार आहे.
पाकिस्तानने अवैध वास्तव्य करत असलेल्या सर्व विदेशी नागरिकांना 31 ऑक्टोबरपर्यंत देश सोडण्यास सांगितले होते. ज्या लोकांनी स्वैच्छिक स्वरुपात देश सोडलेला नाही, त्यांना टप्पाबद्ध पद्धतीने देशाबाहेर काढले जाणार असल्याचे काळजीवाहू सरकारमधील गृहमंत्री सरफराज बुगती यांनी सांगितले आहे.
1 नोव्हेंबरनंतर सरकार अवैध शरणार्थींना देशातून हाकलण्याचे काम सुरू करणार आहे. तर मागील तीन दिवसांमध्ये 20 हजारांहून अधिक अवैध शरणार्थींनी पाकिस्तान सोडला असल्याचा दावा बुगती यांनी केला आहे.
सर्व प्रांतीय सरकारांना या मोहिमेत सक्रीय भूमिका पार पाडावी लागणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रवास दस्तऐवज नसलेल्या लोकांना डिपोर्ट केले जाणार आहे. पाकिस्तानात अनेक वर्षांपासून राहत असलेल्या अवैध शरणार्थींना तात्पुरत्या केंद्रांमध्ये ठेवले जाणार असल्याचे बुगती यांनी सांगितले आहे.









