दिल्ली अबकारी घोटाळा प्रकरण
वृत्तसंस्था/ चंदीगड
अंमलबजावणी संचालनालयाने दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी सुरू असलेल्या चौकशींतर्गत मंगळवारी मोहालीचे आमदार कुलवंत सिंह यांच्या घरी तसेच कार्यालयावर छापे टाकले आहेत. आम आदमी पक्षाचे आमदार असलेले कुलवंत सिंह हे रियल इस्टेट कंपनी जनता लँड प्रमोटर्स लिमिटेडचे मालक असून पंजाबच्या सर्वात धनाढ्या राजकारण्यांपैकी एक आहेत. कुलवंत यांनी माजी कॅबिनेट मंत्री आणि वरिष्ठ काँग्रेस नेते बलवीर सिंह सिद्धू यांना पराभूत केले होते.
दिल्ली आणि पंजाबमधील अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी मोहालीचे आमदार कुलवंत सिंह यांच्या ठिकाणांवर ईडीने छापे टाकले आहेत. दिल्लीनंतर मद्य घोटाळ्यातील पंजाबच्या राजकारण्यांचाही सहभाग आता समोर येणार आहे. कोट्यावधी रुपयांचा घोटाळा समोर आणण्यासाठी ही कारवाई आवश्यक आहे. पंजाब अबकारी धोरण घोटाळ्यात 550 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. यात मुख्यमंत्री भगवंत सिंह मान, हरपाल चिमा हे मुख्य गुन्हेगार आहेत. तर मुख्य लाभार्थी आम आदमी पक्ष असल्याचा आरोप शिरोमणी अकाली दलाचे नेते विक्रम सिंह मजीठिया यांनी केला आहे.
याचबरोबर अमली पदार्थ तस्करीशी संबंधित प्रकरणीही आप आमदाराच्या घरासमवेत अनेक ठिकाणी छापे टाकण्यात येत आहे. आप आमदार कुलवंत सिंह यांच्यासह अनेक हवाला हस्तकांशी निगडित ठिकाणांवर झडती घेण्यात येत आहे. मोहाली, चंदीगड, लुधियाना, जालंधर समवेत राजस्थानच्या गंगानगर भागातही ईडीने कारवाई केली आहे.









