वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमध्ये हिंसा थांबण्याची चिन्हे अद्याप दिसून येत नाहीत. आता तेंगनौपाल जिल्ह्यातील मोरेहमध्ये उग्रवाद्यांकडून एका पोलीस अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. मणिपूर पोलिसांनी यासंबंधी माहिती दिली आहे.
मोरेहमधील पोलीस अधिकारी चिंगथम आनंद हे उग्रवाद्यांच्या समुहाकडून झालेल्या गोळीबारात जखमी झाले होते. पोलीस अधिकारी हे कुकी समुदायाचा प्रभाव असलेल्या सीमावर्ती शहरातील नवनिर्मित हेलिपॅडची पाहणी करण्यासाठी पोहोचले असता हा हल्ला झाला होता.
जखमी पोलीस अधिकाऱ्याला मोरेह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले होते, जेथे त्यांचा मृत्यू झाला आहे. उग्रवाद्यांना पकडण्यासाठी परिसरात शोधमोहीम हाती घेण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
उग्रवाद्यांकडून हल्ल्याची ही घटना अनेक नागरी आणि सामाजिक संघटनांकडून सीमावर्ती शहर मोरेहमधून सुरक्षा दलांना हटविण्याची मागणी करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर घडली आहे. मणिपूर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी मैतेई समुदायाशी संबंधित घरांमधून चोरी करणाऱ्या 10 हून अधिक म्यानमारच्या नागरिकांना अटक केली होती. तर मोरेह शहरातील स्थानिक लोक राज्य पोलीस तसेच कमांडोंना तैनात करण्यास विरोध करत आहेत.
3 मे रोजी राज्यात हिंसा भडकल्यापासून 180 हून अधिक जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मैतेई समुदायाकडून अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली होती. याच्या विरोधात पर्वतीय जिल्ह्यांमध्ये ‘आदिवासी एकजुटता रॅली’ आयोजित करण्यात आली होती. मणिपूरच्या लोकसंख्येत मैतेई लोकांची संख्या सुमारे 53 टक्के असून त्यांचे वास्तव्य प्रामुख्याने इंफाळ खोऱ्यात आहे. तर नागा आणि कुकी समुदायाचे प्रमाण 40 टक्के असून त्यांचे वास्तव्य प्रामुख्याने पर्वतीय जिल्ह्यांमध्ये आहे.









