धार्मिक द्वेष पसरविल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ कोची
केरळ पोलिसांनी कथित स्वरुपात द्वेषयुक्त वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या विरोधात एफआयआर नोंदविला आहे. केरळ पोलिसांनी कोची स्फोटासंबंधी सोशल मीडियावर चंद्रशेखर यांनी केलेल्या टिप्पणीप्रकरणी हा गुन्हा नोंदविला आहे. राज्याच्या मलप्पुरम जिल्ह्dयात एक इस्लामिक समुहाकडून आयोजित एका कार्यक्रमात हमास नेत्याच्या संबोधनासंबंधी चंद्रशेखर यांनी द्वेषयुक्त टिप्पणी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
पोलिसांनी विविध समुहांदरम्यान शत्रुत्व वाढविणारे वक्तव्य केल्याप्रकरणी चंद्रशेखर यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे. भादंविचे कलम 153 अ (धर्म, जात, जन्मस्थान, वास्तव्याच्या आधारावर विविध समुहांमध्ये शत्रुत्व वाढविणे) आणि कलम 120 (ओ) अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. मंत्र्याच्या विरोधात केरळ पोलीस अधिनियमाच्या अंतर्गतही गुन्हाही नोंद झाला आहे.
कलामासेरी येथे यहोवा समुदायाच्या एका धार्मिक सभेत बॉम्बस्फोट झाले होते. यानंतर केंद्रीय राज्यमंत्री चंद्रशेखर यानी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्यावर टीका करणारी पोस्ट केली होती. भ्रष्टाचाराच्या आरोपांनी वेढले गेलेले मुख्यमंत्री पिनाराई विजयन हे तुष्टीकरणाचे राजकारण करत आहेत. दिल्लीत बसून ते इस्रायल विरोधात निदर्शने करत आहेत, तर केरळमध्ये हमासकडून जाहीर आवाहनानंतर निर्दोष ख्रिश्चनांवर हल्ले आणि बॉम्बस्फोट होत असल्याचे चंद्रशेखर यांनी म्हटले होते.
यानंतर मुख्यमंत्री विजयन आणि चंद्रशेखर यांच्यावर वाक्युद्धही झाले होते. ज्यात भाजप नेत्याने विजयन यांना ‘खोटारडे’ संबोधिले होते. तर विजयन यांनी केंद्रीय मंत्र्यांना ‘अत्यंत विषारी’ ठरविले होते. याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी कायद्याचे उल्लंघन करणारे वक्तव्य केल्यास गुन्हा नोंदविला जाणार असल्याचे म्हटले होते.









