अध्याय एकोणतिसावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, साधक सद्गुरुना अनन्यशरण गेला की, तो ब्रह्मज्ञानाचा उपदेश करण्याच्या दृष्टीने ‘अधिकारीरत्न’ होतो. मागे मी तुला दोषांबद्दल सविस्तर सांगितले आहे. ते ज्याच्यात नसतील, त्याचे वैराग्य प्रखर असल्याने तो ब्रह्मज्ञानाचा उपदेश करायला पात्र आहे असे समज. जो सर्व लोकांना वंदन करतो त्याला भक्ती आणि विरक्ती आंदण दिल्यासारखीच असते. जो सद्गुरूंचा आवडता असतो पण त्याचा माझ्यावर विश्वास नसेल तर तोही ब्रह्मज्ञानाचा अधिकारी होऊ शकत नाही. म्हणून सद्गुरुंनी त्याला प्रथम माझ्या चरणी अनन्य करावे, त्याचे अभक्तपण घालवून त्याला वैराग्यपूर्ण करावे आणि मगच त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करावा. स्वत:च्या बायकोचा, मुलाबाळांचा आणि धनाचा ज्याला लोभ असतो, त्याला स्वर्गही मिळत नाही आणि मुक्तीही मिळत नाही. साहजिकच त्याचे जन्ममरणाचे फेरे चुकत नाहीत. म्हणून बायकोचा, मुलाबाळांचा आणि धनाचा लोभ असणाऱ्या व्यक्तीला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करू नये. ह्यापुढे भगवंत सत्छिष्याचे वर्णन करत आहेत. ते म्हणाले, परदारा परधन हा विषय त्याच्या मनातसुद्धा कधी येत नसल्याने तो अत्यंत पवित्र असतो. त्याला हे ज्ञान जरूर द्यावे. तो वैराग्याचा जणू पुतळा असतो आणि विवेकाने ओसंडलेला असतो त्यामुळे तो सद्गुरू सेवेला विकल्यासारखा असतो. तो त्यांच्या चरणी अनन्यभावाने विनम्र असतो. स्वत:चे महात्म्य विसरून तो गुरुसेवेला लागलेला असतो. वेळप्रसंगी स्वत:कडे कमीपणा घेऊन तो सद्भावाने गुरुसेवा करत असतो. अमरश्रेष्ठ असलेल्या सुरवराना तो सद्गुरूचे किंकर म्हणजे दास मानत असतो. एव्हढेच काय त्याला हरिहरापेक्षा सद्गुरू थोर वाटत असतात. त्याला गर्वमद, कामक्रोध इत्यादि विकार नसतात. त्याच्या मनात सद्गुरूंच्या श्रेष्ठ्वाविषयी कोणतीही शंका नसतात. त्यामुळे तो शुद्ध परमार्थी असतो. काया, वाचा, मन, धन आणि स्वमहात्म्य हे सर्व काही सोडून जो सद्गुरूंना अनन्यशरण गेलेला असतो त्याला सच्छिष्य समजावे. सद्गुरुना पूर्णपणे शरण गेलेला असल्याने लोक काय म्हणतील इत्यादि गोष्टींचा अजिबात विचार न करता, सगळी लोकलाज सोडून तो ब्रह्मज्ञानाची याचना करत असतो. चातक पक्षी ज्याप्रमाणे मी पिईन तर पावसाचेच पाणी पिईन असा निश्चय करून पावसाची वाट पहात असतो त्याप्रमाणे सत्छिष्य ऐकीन तर सद्गुरूंचे वचनच ऐकीन असा निश्चय करून सद्गुरूंच्या वचनांची तो वाट पहात असतो. अशा शिष्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश अवश्य करावा. ज्यांना ह्या उपदेशात काय सांगितले आहे हे माहित नाही, ज्यांना शास्त्रार्थ, आश्रमधर्म, जप, होम, इत्यादि बद्दल काहीच माहित नाही परंतु ज्यांना त्यांच्या जन्ममरणाचे निवारण व्हावे असे वाटते, ज्यांना संसारातून विरक्त व्हावे अशी इच्छा होते, ज्यांना मनापासून विषयांचा कंटाळा आलेला आहे, असे लोक जर चित्त, वित्त, जीवित, ह्या सगळ्यासह सद्गुरुंना अनन्यशरण आलेले असतील तर त्यांना संपूर्ण निरपेक्षतेने ह्या ब्रह्मज्ञानाचा अवश्य उपदेश करावा. जेथे वैराग्य संपूर्ण नष्ट होते अशा पद्धतीच्या स्त्राrचा संग कदापि करू नये. अशी स्त्राr बघताच साधकाचे तत्काळ अध:पतन घडून येते. तिच्यापुढे ज्ञानी माणसाची धडगत लागत नाही. पारमार्थिक दृष्ट्या अशा ज्ञानी माणसाच्या हातून अनेक प्रमाद म्हणजे घोडचुका घडू लागतात. त्यामुळे तो परमार्थ करून भवसागर तरुन जाईल अशी शक्यताच उरत नाही. अशी स्त्राr ज्ञात्याकडे नुसता नेत्रकटाक्ष टाकून त्याला घायाळ करून टाकते. तेथे ह्या ब्रह्मज्ञानाच्या उपदेशाचा काय उपयोग? असा मनुष्य परमार्थात सर्वस्वी नागवला जातो. उद्धवा, अशा स्त्रियांची संगत ही सदैव निंद्य असते म्हणून त्यांच्या कदापि नादाला लागणार नाही असे वचन मला दे.
क्रमश:








