अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सेक्रेड गेम्स, गँग्स ऑफ वासेपूर यातील अभिनयाद्वारे नवाजुद्दीन हा दमदार अभिनेता म्हणून ओळखला जात आहे. नवाजुद्दीन आता आणखी एका बायोपिकमध्ये दिसून येणार आहे. यापूर्वी त्याने ‘ठाकरे’ या चित्रपटात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारली होती. नव्या बायोपिकमध्ये नवाजुद्दीन हा सीमा शुल्क अधिकारी कोस्टाओ फर्नांडिस यांची भूमिका साकारणार आहे.
कोस्टाओ यांनी 1990 च्या दशकात सोन्याच्या तस्करीच्या विरोधात कारवाई केली होती. त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन सेजल शाह करणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण लवकरच सुरू होणार असून यात कोस्टाओ यांच्या जीवनातील रोमांचक घटना दाखविल्या जातील अशी अपेक्षा आहे. सीमाशुल्क अधिकारी फर्नांडिस यांना गुन्हेगार आणि तस्करांच्या विरोधातील कारवाईसाठी ओळखले जाते. त्यांनी स्वत:चा जीव जोखिमीत टाकून तस्करीचे अनेक प्रयत्न रोखले होते. नवाजुद्दीन पहिल्यांदाच कस्टम अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. नवाजुद्दीन यापूर्वी हड्डी या चित्रपटात दिसून आला होता.









