भाजप जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये : माजी नगरसेवक अजित ठाणेकरांवर आरोप करणाऱ्या संपतराव पाटील, करण शिंदेंचा घेतला समाचार
कोल्हापूर प्रतिनिधी
थेट पाईपलाइन संदर्भात माजी नगरसेवक अजित ठाणेकरांनी 2016 पासून जनतेसमोर वस्तुस्थिती मांडली आहे. कोणाच्यातरी राजकीय महत्वाकांक्षेमुळे ही अव्यवहार्य आणि खर्चिक योजना कोल्हापूरच्या माथी मारली गेली. हे त्यांनी अनेकवेळा कागदोपत्री दाखवून दिले आहे. त्यातील पुलाच्या बांधकामातील भ्रष्टाचार आणि तांत्रिक त्रुटी अनेकवेळा महासभेत आणि जनतेसमोर उघड केली असल्याचे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष हमेंत आराध्ये यांनी पत्रकाद्वारे म्हटले आहे. यामध्ये त्यांनी माजी नगरसेवक ठाणेकर यांच्यावर आरोप करणाऱ्या काँग्रेसचे संपतराव चव्हाण-पाटील आणि करण शिंदे यांचा खरपूस शब्दात समाचार घेतला आहे.
महानगरपालिकेचे काम असो वा वैयक्तीक अडचण असो माजी नगरसेवक अजित ठाणेकर नागरिकांच्या मदतीला सदैव तत्पर असतात. प्रभागातील सर्वच सामजिक कार्यात ते हिरिरीने सहभागी होतात. त्यामुळे कुणीतरी सांगितले म्हणून त्यांच्याबद्दल पत्रक प्रसिद्ध करणाऱ्यांनी प्रथम आपले सामाजिक कार्य काय ते तपासावे व नंतरच बोलावे असे आवाहन भाजपचे हमेंत आराध्ये काँग्रेसचे संपतराव चव्हाण-पाटील, करण शिंदे यांना केले आहे.
पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून गेल्यानंतर आणि विरोधी पक्षात असतानाही माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी जे काम केले आहे, ते आदर्शवत आहे. कोणा सोम्या गोम्याने त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले तरी प्रभागातील सामान्य नागरिक खपवून घेणार नाहीत. थेट पाईपलाइन सोबतच महापालिकेच्या सेफ सिटी प्रकल्पातील त्रुटी आणि भ्रष्टाचार, एच.सी. एल्. कंपनीच्या ऑनलाईन प्रणालीतील चुकीच्या गोष्टी आणि त्यामुळे घरफाळ्यात झालेले घोटाळे, जयंती नाला पंपिंग स्टेशनच्या विद्युतीकरण कामातील भ्रष्टाचार असे अनेक विषय ठाणेकरांनी महानगरपालिकेत उघडकीस आणले. याचबरोबर तटाकडील तालीम प्रभागातील अनेक समस्या त्यांनी सोडविल्या असल्याचे हमेंत आराध्ये यांनी स्पष्ट केले आहे. या पत्रकावर कपिल धर्माधिकारी, अशोक लोहार, राहूल पाटील, सुदर्शन सावंत, अनुराधा गोसावी आदींच्या सह्या आहेत.