त्यांच्या जागा बँका व तेल गॅस कंपन्यांनी घेतल्या : तिमाहीतील आकडेवारीवरुन बाब स्पष्ट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील कॉर्पोरेट क्षेत्राची एकूण कमाई एकेकाळी माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपन्यांद्वारे केली जात होती, परंतु आता त्यांची जागा बँका आणि तेल आणि वायू कंपन्यांनी घेतली आहे. आर्थिक वर्ष 2024 च्या दुसऱ्या तिमाहीत, कंपन्यांच्या एकूण उत्पन्नात आयटी सेवा क्षेत्राचे योगदान 17.4 टक्क्यांवर आले, जे गेल्या पाच वर्षांतील सर्वात कमी म्हटले जात आहे. कमाईतील बँका आणि वित्तीय कंपन्यांचा हिस्सा 46.5 टक्के आणि तेल-वायू कंपन्यांचा वाटा 16.8 टक्के झाला आहे, अशी माहिती सिस्टेमॅटिक्स इन्स्टिट्यूशनल इक्विटीच्या संशोधन आणि इक्विटी स्ट्रॅटेजी यांच्या अहवालामधून देण्यात आली आहे.
आयटी क्षेत्राच्या शिखरावर, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि विप्रो सारख्या कंपन्यांनी सर्व सूचीबद्ध कंपन्यांच्या एकूण निव्वळ नफ्यात एक तृतीयांशपेक्षा जास्त योगदान दिले असल्याचे सांगितले जाते.
सिस्टेमॅटिक्स इन्स्टिट्यूशनल इक्विटीचे संशोधन आणि इक्विटी स्ट्रॅटेजीचे प्रमुख धनंजय सिन्हा म्हणाले, ‘कोविड नंतर, आयटी आणि बँका त्याचप्रमाणे वित्तीय कंपन्यांनी कंपन्यांच्या एकूण नफ्यात सर्वाधिक योगदान दिले आहे. परंतु आयटीमधील नफ्याची वाढ सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली आहे आणि बीएफएसआय कर्जाची मागणी कमी होण्याची आणि मार्जिन कमी होण्याची चिन्हे दाखवत आहे. संपूर्ण कॉर्पोरेट जगताच्या कमाईसाठी हे नकारात्मक चिन्ह आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत सूचिबद्ध आयटी कंपन्यांच्या एकूण निव्वळ नफ्यात गेल्या वर्षी जुलै-सप्टेंबरच्या तुलनेत केवळ 3.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे, जी पाच तिमाहीतील सर्वात कमी वाढ आहे.
त्या तुलनेत, बँका, वित्त आणि स्टॉक ब्रोकिंग आणि तेल आणि वायू क्षेत्रातील कंपन्यांच्या नफ्यात जोरदार वाढ झाल्यामुळे, 428 सूचीबद्ध कंपन्यांच्या एकूण निव्वळ नफ्यात तिमाहीत 35.4 टक्क्यांनी वाढ झाली.
एफएमसीजीचे योगदान घटले
कंपन्यांच्या एकूण कमाईमध्ये एफएमसीजी कंपन्यांचे योगदान कमी झाले. दुसऱ्या तिमाहीत हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी आणि नेस्लेसारख्या एफएमसीजी कंपन्यांच्या एकूण नफ्यात वाटा 6.2 टक्क्यांवर आला, जो पाच वर्षांतील सर्वात कमी आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत तो 7.7 टक्के होता.
विश्लेषकांच्या मते, बीएफएसआय आणि तेल आणि वायू क्षेत्रावरील वाढत्या अवलंबित्वामुळे, पुढे कंपन्यांच्या नफ्यात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होऊ शकतात.









