महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून निपाणी आगारातून महाराष्ट्रात होणारी बस सेवा तात्पुरती स्थगित ठेवण्यात आली आहे. परिवहन महामंडळाकडून पुढील आदेश येईपर्यंत ही बससेवा बंद राहणार आहे.
निपाणी हे सीमावर्ती शहर असल्याने येथून कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यात बससेवा सुरू आहे. महाराष्ट्रात येथून दररोज सुमारे 200 बसफेऱ्या होतात. प्रामुख्याने कोल्हापूर, गडहिंग्लज, इचलकरंजी, पुणे, सांगली, मिरज, सोलापूर या मार्गावर बससेवा सुरू आहे. यातून लाखो रुपयांचे उत्पन्न आगाराला मिळते. मात्र गेल्या आठ दिवसांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले असून सरकारी वाहने जाळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निपाणी आगारातून महाराष्ट्रात होणारी बससेवा तात्पुरती बंद ठेवण्यात आल्याचे आगारातर्फे सांगण्यात आले आहे.