हॉटेल आरक्षित करण्यासाठी आज हॉटेल व्यावसायिकांची बैठक
बेळगाव : राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन बेळगाव येथील सुवर्णविधानसौध येथे भरविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून आतापासूनच तयारी करण्यात येत आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची पूर्तता करण्यावर भर दिला जात आहे. अधिवेशनाला येणाऱ्या मंत्र्यांसह अधिकाऱ्यांची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रशासनाने तयारी चालविली आहे. यासाठी हॉटेल व्यावसायिकांची मंगळवारी बैठक बोलाविण्यात आली आहे. दुष्काळ परिस्थिती असल्याने राज्य सरकार यावेळी हिवाळी अधिवेशन बेळगाव येथे घेण्याची शंका निर्माण झाली होती. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिने सरकारला अधिवेशन बेळगाव येथे भरविणे भाग पडले आहे. दुष्काळ परिस्थिती असल्याने खर्चाची बाब लक्षात घेत बेळगावला अधिवेशन भरविण्यावर शंका उपस्थित केली जात होती. मात्र सरकारने लोकसभेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून अधिवेशन भरविण्याचे निश्चित केले आहे, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. अधिवेशन भरविण्याचे निश्चित झाल्याने तयारीला वेग देण्यात आला आहे. अधिवेशनासाठी येणाऱ्या मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी चालविली आहे. यासाठी शहरातील हॉटेल मालकांची मंगळवार दि. 31 रोजी बैठक बोलाविण्यात आली आहे. अधिवेशन काळात हॉटेल आतापासूनच आरक्षित करण्यासाठी ही बैठक बोलाविण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.









