2.50 लाखांवरून 5 लाख : गोरगरिबांना वैयक्तिक विकासासाठी ठरणार लाभदायक
बेळगाव : रोजगार हमी योजना ग्रामीण भागातील जनतेसाठी वरदान ठरली आहे. गरीब कुटुंबांना या योजनेंतर्गत रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे. वैयक्तिक विकासासाठीही योजना राबविल्या जात आहेत. वैयक्तिक योजनेंतर्गत विकासकामे राबविण्यासाठी देण्यात येणाऱ्या निधीत 2.50 लाखांवरून 5 लाखांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यामुळे अनेक जणांना याचा लाभ होणार आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत जॉबकार्ड असणाऱ्या कामगारांना वैयक्तिक योजनेंतर्गत 2.50 लाख रुपये मंजूर करण्यात येत होते. ही रक्कम आता 5 लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांना उद्योग उपलब्ध करून देण्याबरोबरच वैयक्तिक योजनेच्या माध्यमातून स्वत:च्या विकासासाठीही मदत केली जात आहे. पात्र लाभार्थ्यांना उद्योग-व्यवसाय थाटण्यासाठी ही योजना उपयोगी ठरत आहे. या योजनेंतर्गत द्राक्ष उत्पादन, आंबा, पपई, चिंच, सीताफळ, डाळिंब, अंजीर, फणस आदी बागायती पिकांच्या उत्पादनासाठी मदत केली जात आहे. याबरोबरच जनावरांसाठी गोठा अथवा बकरी व कुक्कुटपालनासाठी शेड उभारणी, शेत तलाव अशा वैयक्तिक कामांसाठीही ही मदत उपयोगी ठरत आहे.
अंमलबजावणी करण्याची पीडीओंना सूचना
रोहयोअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या वैयक्तिक योजनेतून गोरगरिबांना स्वावलंबी बनविण्याचा या योजनेचा उद्देश आहे. ग्रामीण विकास आणि पंचायतराज खात्याच्या अधिकाऱ्यांकडून जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी, तालुका पंचायत अधिकारी, ग्राम पंचायत पीडीओंना योजनेची अंमलबजावणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र व्यक्तीची नोंद रोहयो कामगार म्हणून असणे आवश्यक आहे. त्यांच्या नावचे जॉबकार्ड असावे. योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबातील किमान एक सदस्य रोहयो कामगार म्हणून कार्यरत असावा. या वैयक्तिक स्वरुपातील योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित व्यक्ती अनुसूचित जाती, जमाती, भटकी जमात, दारिद्र्या रेषेखालील, महिला प्रधान कुटुंब, दिव्यांग, वनहक्क कायदा 2006 लाभार्थी, लघु आणि अत्यल्प भूधारक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
शेतकऱ्यांना उपयोगी ठरणार
रोहयो योजनेंतर्गत वैयक्तिक स्वरुपातील मदत 2.50 लाखांवरून 5 लाखांपर्यंत करण्यात आल्याने शेतकऱ्यांना अत्यंत उपयोगी ठरणार आहे. बागायत पिके घेण्यासाठी अधिक खर्च येतो. त्यामुळे ही योजना लाभदायक ठरणार असून वैयक्तिक स्वरुपात आर्थिक सुधारणेसाठी वरदान ठरणार आहे.
6 लाख रोहयो जॉबकार्डधारक…
जिल्ह्यामध्ये 6 लाख रोहयो जॉबकार्डधारक कामगार आहेत. वैयक्तिक कामांसाठी पात्रताधारक कुटुंबांना 2.50 लाख रुपये मदत देण्यात येत होती. ती आता 5 लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे गरीब कामगारांना याचा लाभ होणार आहे. पात्रताधारकांना या योजनेचा लाभ घेता येईल.
-हर्षल भोयर, जि. पं. कार्यकारी अधिकारी.









