30 बसेसची व्यवस्था : प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रयत्न
बेळगाव : भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी बेळगाव-पंतबाळेकुंद्री मार्गावर परिवहनने जादा बसची व्यवस्था केली आहे. सोमवारपासून पंतबाळेकुंद्री येथील यात्रेला प्रारंभ झाला आहे. या पार्श्वभूमीवर 30 व 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर रोजी बस स्थानकातून जादा 30 बस धावणार आहेत, अशी माहिती परिवहनने दिली. दरम्यान, प्रवाशांच्या सोयीखातर बेळगाव-पंतबाळेकुंद्री मार्गावर अतिरिक्त बससेवेची व्यवस्था केली आहे. मध्यवर्ती बस स्थानकातून सकाळी 6 पासून रात्री 10 वाजेपर्यंत या जादा बस सुरू राहणार आहेत. सौंदत्ती यल्लम्मा आणि जोतिबा यात्रेतून परिवहनला समाधानकारक 84 लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे. त्यामुळे पंतबाळेकुंद्री यात्रेतूनही चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा आहे. यात्रा, जत्रा आणि पर्यटनातून परिवहनला अतिरिक्त महसूल प्राप्त होतो. मागील दोन-तीन वर्षांत कोरोनामुळे परिवहनला या अतिरिक्त महसुलापासून वंचित राहावे लागले होते. मात्र यंदा यात्रा, जत्रा पूर्ण क्षमतेने भरू लागल्या आहेत. त्यामुळे परिवहनचा महसूल वाढू लागला आहे.
प्रवाशांची काळजी घेणार
पंतबाळेकुंद्री यात्रेसाठी 30 बसची व्यवस्था करण्यात आली आहे. मध्यवर्ती बस स्थानकातून ही बससेवा पुढील तीन दिवस सुरू राहणार आहे. यात्रा काळात प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. महिलांचा मोफत प्रवास सुरू आहे.
-ए. वाय. शिरगुप्पीकर, डेपो मॅनेजर









