मडगाव : यजमान गोव्याला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक पेंचाक सिलाट या खेळात करिना शिरोडकर हिने मिळवून दिले आहे. कायदा पदवीचे शिक्षण पूर्ण केलेल्या 23 वर्षीय करिनाने अंतिम लढतीत जम्मू काश्मीरच्या जिया चौधरी हिच्यावर पूर्ण वर्चस्व गाजवताना महिलांच्या तांडिग 80 ते 85 किलो वजनीगटात 30-15 अशा मोठ्या फरकाने विजय साकारला. कांपाल क्रीडा ग्राममध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यजमान गोव्याचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. आपल्या कुटुंबातील सदस्य तसेच गोमंतकीय पाठिराख्यांच्या उपस्थितीत तिने आक्रमक व वेगवान सुरूवात करताना सुरूवातीलाच 11-8 अशी आघाडी घेतली. या आघाडीनंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही व आरामात सुवर्णपदकाला गवसणी घातली.
‘राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पेंचाक सिलाट खेळाचा प्रथमच समावेश करण्यात आला आहे. पहिल्याच स्पर्धेत गोव्यासाठी सुवर्णपदक जिंकू शकले याचा मला खूप आनंद आहे, असे सुवर्णपदकानंतर आपली प्रतिक्रिया देताना करिना शिरोडकर म्हणाली. मला मार्शल आर्टची आवड असून महिन्याभरपूर्वीच हा खेळ खेळायला आपण सुरूवात केली आणि आपणास तो आवडलाही, असे तायक्वांदो खेळात राष्ट्रीय स्तरावर गोव्याचे प्रतिनिधीत्व केलेली मिरामार येथील रहिवासी करिना शिरोडकर म्हणाली.
तायक्वांदो हा खेळ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा भाग असताना पेंचाक सिलाट या क्रीडाप्रकाराकडे कशी वळली, असे विचारले असता, करिना म्हणाली की, तिला मुळात मार्शल आर्ट प्रकार शिकण्याची आवड आहे आणि हा एक लढाऊ खेळ असल्याने तिने हा खेळ शिकण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पेंचाक सिलाटमध्ये यजमान गोव्याला बऱ्यापैकी यश प्राप्त झाले आहे. गोव्याला तांडिंगमध्ये अँस्लेट सॅबेस्तियन (महिला 55-60 किलो), क्लो फुर्तादो (महिला 75-80 किलो), आशा नाईक (महिला 65-70 किलो), मोहम्मद इरफान खान (पुरूष 65-70 किलो), गणपतराव देसाई (पुरूष 75-80 किलो), सागर पालकोंडा (पुरूष 85 ते 90 किलो) व सिराज खान (पुरूष 90-95 किलो) यांनी ब्राँझपदके मिळवून दिली आहेत.









