कुडाळ – सरंबळ बसफेरी उशिरा सुटत असल्याने आक्रमक पवित्रा
कुडाळ – वार्ताहर
कुडाळ – सरंबळ बसफेऱ्या वारंवार उशिराने सुटत असल्याने ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. शनिवारी दुपारीची बस तब्बल दोन तास उलटूनही सोडण्यात न आल्याने सरपंच – उपसरपंचासह ग्रामस्थांनी बसस्थानकावर धडक देत मार्गस्थ होणाऱ्या अन्य सर्व बसेस रोखून धरल्या. त्यानंतर वाहतूक नियंत्रक यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी ते आंदोलन मागे घेतले. मात्र दोन दिवसात बसफेऱ्या वेळेत सुटल्या नाहीत, तर नंतर संपूर्ण दिवस येथून एकही बस सोडायला देणार नाही,असा इशारा सरपंच रावजी कदम यांनी दिला. कुडाळ बसस्थानकावर सुटणाऱ्या बसेसचे वेळापत्रक गेले काही महिने पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे . त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांसह ,विद्यार्थ्यांचीही मोठी गैरसोय होत आहे. कुडाळ बस स्थानकावरून दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सुटणारी कुडाळ – सरंबळ बसफेरी तीन वाजेपर्यंत स्थानकावरुन सोडण्यात आली नाही. त्या मार्गावरील प्रवासी व विद्यार्थ्यांना ताटकळत उभे राहावे लागले. बसफेरीच्या प्रशिक्षित असलेल्या प्रवाशांनी सरपंच रावजी कदम व काही ग्रामस्थांशी संपर्क साधला. आणि बस अद्याप सोडण्यात आली नाही ,असे सांगितले. त्यावेळी रावजी कदम, उपसरपंच सागर परब, अमोल कदम व काही ग्रामस्थांनी लागलीच कुडाळ बसस्थानक गाठले. त्यांनी आक्रमक पवित्रा घेत येथील बसस्थानकावरून मार्गस्थ होणाऱ्या बसेस रोखल्या.
वारंवार सरंबळ बसफेऱ्या उशिराने सोडल्या जातात. ग्रामस्थ व कुडाळला येणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होतात.एस . टी अधिकारी यांची भेट घेऊन या समस्येकडे लक्ष वेधले.ग्रामपंचायत माध्यमातून पत्रव्यवहार केला.परंतु , काहीच सुधारणा होत नाही.आता काही ऐकून घेणार नाही.,असा पवित्रा सरपंच कदम व उपसरपंच परब यांनी घेतला.जोपर्यत ठोस निर्णय मिळत नाही. रावजी कदम यानी भ्रमणध्वनीवरून वाहतूक निरीक्षक श्री राठोड यांच्याशी संपर्क साधून आपण घेतलेल्या निर्णयाची कल्पना दिली. श्री राठोड येथील बसस्थानकावर दाखल झाले.त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. दरम्यान , सकाळी 7 वाजता कुडाळला शाळेत विद्यार्थी येतात.दुपारची बस फेरी उशिराने सोडण्यात येते हे वारंवार सुरू आहे. त्यामुळे सकाळी आलेले विद्यार्थी तीन – चार वाजेपर्यंत घरी पोहोचतात.सकाळची बसफेरीही वेळेत सुटत नाही. आम्ही लक्ष वेधूनही एसटी प्रशासन काहीच दखल घेत नाही.त्यामुळे आम्ही माघार घेणार नाही,असे सरपंच श्री कदम यानी सांगितले.त्यावर उद्यापासून सदर बस फेऱ्या वेळेत सोडण्याचे आश्वासन श्री राठोड यांनी आंदोलनकर्त्याना दिले. चार वाजता सदर बस सोडण्यात आली.त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.









