एकाच रात्रीत फोडली दहा दुकाने, लाखोंचा ऐवज चोरीला
प्रतिनिधी/ बेळगाव
शुक्रवारी मध्यरात्रीनंतर बेळगाव शहरातील मुख्य बाजारपेठेत चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. मुख्य बाजारपेठेतील दहा दुकाने फोडण्यात आली असून लाखो रुपयांचा ऐवज लांबविण्यात आला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांत एकच खळबळ माजली आहे. अनेक आस्थापनाबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरट्यांची छबी कैद झाली असून पोलिसांनी फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.
पांगुळ गल्ली, भेंडीबाजार, मेणसे गल्ली, शेरी गल्ली व खडेबाजार येथे कापड दुकान, औषध दुकान, किराणा दुकान, चप्पल दुकान, चष्म्याचे दुकान अशी दुकाने फोडण्यात आली आहेत. शनिवारी सकाळी चोरीचे हे प्रकार उघडकीस आले आहेत. रात्री उशिरापर्यंत यासंबंधी एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
चोऱ्यांच्या मालिकेने व्यापाऱ्यांत घबराट पसरली आहे. शनिवारी आठवडी बाजाराचा दिवस. दुकान उघडण्यासाठी आलेल्या व्यापाऱ्यांना धक्काच बसला. सर्व ठिकाणी शटर उचकटून दुकानात प्रवेश करण्यात आला असून काही दुकानात चोरट्यांच्या हाती काहीच लागले नसले तरी शटरचे नुकसान झाले आहे.
पांगुळ गल्ली येथील संस्कार सारीज या साडी दुकानाचे शटर उचकटून गल्ल्यातील 20 हजार रुपये रोकड पळविण्यात आली आहे. जाता जाता चोरट्यांनी सीसीटीव्हीचे डीव्हीआरही पळविले आहे. तेथून जवळच असलेल्या भेंडीबाजार येथील सिद्धेश्वर ट्रेडर्स या किराणा दुकानाचे शटर उचकटून चोरीचा प्रयत्न करण्यात आला.
मेणसे गल्ली येथील न्यू लाईफ मेडिकल्स या औषध दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील रोकड पळविली आहे. शुक्रवारी मध्यरात्री 1 ते 2 या वेळेत ही घटना घडली असून चौघे जण शटर उचकटताना सीसीटीव्हीत त्यांची छबी कैद झाली आहे. सुरुवातीला दोघे जण शटर उचकटण्याचा प्रयत्न करतात. नंतर चौघे जण जोर लावून औषध दुकानाचे शटर उचकटतात. चोरट्यांची छबी स्पष्टपणे कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या दुकानात सहा वर्षात घडलेली ही दुसरी चोरी आहे.
शेरी गल्ली येथील अशोक क्लॉथ स्टोअर्स व या दुकानाशेजारीच असलेल्या शक्ती जनरल स्टोअर्स फोडण्यात आली आहेत. शटर उचकटून चोरट्यांनी या दोन्ही दुकानात प्रवेश केला असून या दोन्ही दुकानातून नेमका कितीचा ऐवज पळविण्यात आला आहे, याचा तपशील मिळाला नाही.
एकाच इमारतीतील पाच दुकाने लक्ष्य
खडेबाजार येथील गॅलॅक्सी प्लाझा या इमारतीतील सुमारे पाच दुकाने फोडण्यात आली आहेत. गॅलॅक्सी सन ग्लासेस हे चष्म्याचे दुकान फोडून 83 हजार रुपयांची रोख रक्कम व बारा मनगटी घड्याळे चोरट्यांनी पळविली आहेत. याच इमारतीतील हरमाईन फॅब्रिक्स या कापड दुकानाचे तीन शटर उचकटण्यात आले आहेत. एस. के. ट्रेडर्स या दुकानाबरोबरच या इमारतीतील एकूण पाच दुकानांचे शटर उचकटण्यात आले आहेत. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. मार्केट पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली आहे. रात्री उशिरापर्यंत नेमका कितीचा ऐवज चोरट्यांनी पळविला आहे, याचा तपशील मिळविण्याचे काम पोलीस स्थानकात सुरू होते.
सुझुकी एक्सेस चोरीला
पाटील मळा येथील एका घरासमोर उभी करण्यात आलेली सुझुकी एक्सेस-125 ही मोटारसायकल चोरण्यात आली आहे. 22 ऑक्टोबर 2023 रोजी ही घटना घडली असून यासंबंधी विनायक कांगले यांनी खडेबाजार पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.









