
वृत्तसंस्था/ लखनौ
भारत आणि इंग्लंड आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत विरोधाभासी पद्धतीने खेळले असून त्याचे परिणामही तितकेच विरोधाभासी राहिले आहेत आणि आज रविवारी दोन्ही संघ येथे आमनेसामने येतील तेव्हा त्यात बदल होण्याची शक्यता नाही. भारत साखळी टप्प्यात अव्वल स्थानावर विराजमान होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, तर चार वर्षापूर्वी जिंकलेल्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी धडपडण्याचा प्रसंग इंग्लंडवर आलेला आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने सलग पाच सामन्यांत लक्ष्याचा यशस्वीरीत्या पाठलाग केलेला असून त्यांची फारशी पावले चुकलेली नाहीत. इंग्लंडने त्यांच्या आक्रमक खेळाच्या शैलीने एकदिवसीय व टी20 क्रिकेटमध्ये यश मिळविलेले असले, तरी त्यांचा हा दृष्टिकोन भारतीय परिस्थितीत चाललेला नाही. इंग्लंडच्या तुलनेत भारताला काळजी करण्याची फारशी गरज नाही. असे असले, तरी पुढील दोन सामन्यांसाठी त्यांना हार्दिक पंड्याची अष्टपैलू सेवा मिळणार नाही. एरव्ही फिरकीपटूंना मदत करण्याची शक्यता असलेल्या खेळपट्टीवर आर. अश्विनने शार्दुल ठाकूरची जागा घेतली असतील. मात्र, हार्दिकच्या अनुपस्थितीमुळे संघ व्यवस्थापनाला पाच गोलंदाज खेळवणे भाग पडणार आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा हे खेळणे पक्के राहणार आहे. फिरकीपटू म्हणून अश्विनला सामावून घ्यायचे झाल्यास भारताला मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यापैकी एकाची निवड करावी लागेल
पॉवरप्लेमधील रोहितच्या फटकेबाजीमुळे भारताला मोलाची मदत झालेली असून भारताने आपण लक्ष्याचा पाठलाग करण्यात कुशल असल्याचे दाखवून दिलेले आहे. हार्दिकच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी निवडण्यात आलेले असून तोही प्रभाव पाडण्यासाठी उत्सुक असेल. धर्मशाला येथे आखूड टप्प्याच्या गोलंदाजीचा सामान करण्याच्या बाबतीत श्रेयसचा संघर्ष पुन्हा दिसून आलेला आहे. त्यामुळे तो विरोधकांना खोटे ठरविण्याची वाट पाहत असेल.
डेंग्यूमुळे पहिल्या दोन सामन्यांना मुकलेल्या शुभमन गिलला विशेष खेळी खेळण्यास सज्ज झालेला असून लखनौच्या प्रेक्षकांना कदाचित विराट कोहलीचे विक्रमाशी बरोबरी करणारे 49 वे शतक पाहायला मिळू शकते. उत्तर प्रदेशचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवही येथील अत्याधुनिक स्टेडियमवर इंग्लंडच्या फलंदाजांना चकवा देण्यास सिद्ध असेल. इंग्लंडची जोस बटलर, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, हॅरी ब्रूक ही जागतिक क्रिकेटमधील नावाजलेली नावे असली, तरी त्यांना त्यानुरुप चमक दाखविता आलेली नाही. इंग्लंडसाठी गोलंदाजीच्या आघाडीवरही चिंतेचे वातावरण आहे. कारण त्यांचा उत्कृष्ट वेगवान गोलंदाज रीस टोपली दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी कार्सेने संघात स्थान मिळवले आहे, तर मार्क वुड प्रभावी मारा करू शकलेला नाही. तथापि, मोईन अली आणि आदिल रशीद ही फिरकी जोडी फॉर्मात असलेल्या भारतीय फलंदाजांना धोका निर्माण करू शकते.
संघ : इंग्लंड-जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गस अॅटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशिद, ज्यो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, ब्रायडन कार्स, डेव्हिड विली, मार्क वूड, ख्रिस वोक्स.
भारत-रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या.
सामन्याची वेळ : दुपारी 2 वा.









