लॉगिन पासवर्ड दुसऱ्याला दिल्याच्या कबुलीने कोंडी : संसदीय शिष्टाचार समितीकडून 2 नोव्हेंबरची अंतिम मुदत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘कॅश फॉर क्वेरी’ प्रकरणात अडकलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. संसदीय शिष्टाचार समितीने त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स पाठवले आहे. सुरुवातीला 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता समितीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, आता संसदीय शिष्टाचार समितीने आता त्यांच्या विनंतीवरून 31 ऑक्टोबरऐवजी 2 नोव्हेंबर रोजी 11 वाजता त्यांची सुनावणी निश्चित केली आहे. 2 नोव्हेंबर ही सुधारित तारीख असून त्यादिवशी हजर रहावेच लागेल, असा इशारा संसदीय समितीकडून देण्यात आला आहे. याचदरम्यान, मोइत्रा यांनी आपण हिरानंदानी यांना संसदेचा लॉगिन-पासवर्ड दिल्याची कबुली दिल्यामुळे नजिकच्या काळात त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत.
खासदार मोइत्रा यांना संसदीय शिष्टाचार समितीसमोर हजर राहून आपल्या बचावात तथ्य मांडण्यास सांगण्यात आले आहे. याप्रकरणी महुआ मोइत्रांविरोधात तक्रार करणारे भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे आणि वकील जय अनंत देहादराय यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत. परंतु, महुआ मोइत्रा यांनी शुक्रवारी शिष्टाचार समितीचे अध्यक्ष विनोद सोनकर यांना पत्र लिहून आपले लोकसभा मतदारसंघात पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे सुधारित तारीख देण्याची विनंती केली होती.
महुआ मोइत्रा यांनी पाठविलेल्या पत्रात आपल्याला 5 नोव्हेंबरनंतरची वेळ देण्यात यावी अशी मागणी केली होती. “मी पश्चिम बंगाल राज्याचे प्रतिनिधित्व करत असून तिथे दुर्गा पूजा हा सर्वात मोठा सण आहे. 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर 2023 या कालावधीत माझ्या मतदारसंघातील अनेक पूर्व-नियोजित विजयादशमी कार्यक्रम/बैठकांमध्ये (सरकारी आणि राजकीय दोन्ही) सहभागी होण्याचे मी आधीच वचनबद्ध आहे. अशा परिस्थितीत मी 31 ऑक्टोबर 2023 रोजी दिल्लीत उपस्थित राहू शकत नाही. त्यामुळे 5 नोव्हेंबर 2023 नंतर कोणत्याही तारखेला आणि वेळेस समितीसमोर वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्यासाठी वेळ देण्याची विनंती करते,” असे मोइत्रा यांनी पत्रात स्पष्ट केले होते.
महुआ मोइत्रा यांच्या पत्राची दखल घेत लोकसभा सचिवालयाने शिष्टाचार समितीचे अध्यक्ष विनोद सोनकर यांच्या सूचनेनुसार त्यांना पत्र लिहून 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता समितीसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. यासोबतच शिष्टाचार समितीने महुआ मोइत्रा यांना लिहिलेल्या पत्रात या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सुधारित तारीख वाढवण्याची पुन्हा कोणतीही विनंती करू नये, असेही बजावले आहे.
हिरानंदानी यांना संसदेचा लॉगिन-पासवर्ड दिल्याची कबुली
तृणमूल खासदार महुआ मोइत्रा यांनी संसदीय लॉगिन आयडी पासवर्ड आपला व्यापारी मित्र दर्शन हिरानंदानी याला दिला होता, असे कबूल केले आहे. परंतु त्या बदल्यात कोणतेही पैसे घेतले नाहीत, असे त्यांनी सांगितले. या कबुलीनाम्याने त्यांच्या अडचणीत भर पडण्याची चिन्हे आहेत. कोणताही खासदार स्वत:चे प्रश्न टाईप करत नाही. मी त्यांना (दर्शन हिरानंदानी) माझा संसदीय लॉगिन आयडी-पासवर्ड दिला होता जेणेकरून त्यांच्या कार्यालयातील कोणीतरी प्रश्न टाईप करून वेबसाईटवर अपलोड करू शकेल, असे त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले आहे. संसदेच्या वेबसाईटवर प्रश्न अपलोड करण्यासाठी ओटीपी (वन-टाइम पासवर्ड) आवश्यक असतो. माझ्या मोबाईल नंबरवर ओटीपी येतो. अशा परिस्थितीत माझ्या नकळत दर्शन किंवा इतर कोणीही प्रश्न अपलोड करू शकत नाही, असेही त्या पुढे म्हणाल्या.
निशिकांत दुबेंकडून सातत्याने हल्लाबोल
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी तृणमूल काँग्रेसचे खासदार महुआ मोइत्रा यांनी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी उद्योजकाकडून लाच घेतल्याचा आरोप केला आहे. त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना मोइत्रा यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची विनंती केली आहे. पैसे आणि भेटवस्तूच्या बदल्यात विदेशात स्थायिक उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्या हितांसाठी संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप मोइत्रा यांच्यावर झाला आहे. मोइत्रा यांच्यावर झालेला आरोप अत्यंत गंभीर स्वरुपाचा आहे. 2005 मध्ये अशाच एका प्रकरणात अनेक खासदारांना सदस्यत्व गमवावे लागले होते. आता या नवीन प्रकरणात फायरब्रँड प्रतिमा तयार करणाऱ्या महुआ मोइत्रा या प्रत्यक्षात पैसे घेऊन प्रश्न विचारणाऱ्या निघाल्या. हा केवळ संसदेचा अवमान नसून विशेषाधिकाराचे उल्लंघन देखील असल्याचा दावा खासदार दुबे यांनी केला आहे.









