बद्रुद्दिन अजमल यांचे खळबळजनक विधान, मुस्लीम संघटनांकडून तीव्र विरोध
वृत्तसंस्था / गुवाहाटी
गंभीर गुन्हे करणाऱ्यांमध्ये मुस्लीम समाजातील लोकच आघाडीवर असून कारागृहात जाण्यात त्यांचा प्रथम क्रमांक आहे, असे अत्यंत खळबळजनक विधान आसाममधील ऑल इंडिया युनायडेट डेमॉव्रेटिक फ्रंटचे नेते बद्रुद्दिन अजमल यांनी केले आहे. त्यांनी हे विधान 20 ऑक्टोबरच्या एका कार्यक्रमात केले. अनेक मुस्लीम संघटनांनी त्यांच्या विधानाचा निषेध केला असून टीकाही केली आहे.
बलात्कार, चोरी, लूट आणि दरोडेखोरी असे गंभीर गुन्हे करणाऱ्यांमध्ये मुस्लीम गुन्हेगारांचे प्रमाण सर्वाधिक आहे. कारागृहात जाणारेही याच धर्मातील गुन्हेगार बहुसंख्येने आहेत. मुस्लीम समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. शिक्षणाच्या अभावामुळे मुस्लीम समाजातील तरुण गुन्ह्यांच्या जाळ्यांमध्ये सहजगत्या फसतात. ही स्थिती सुधारायची असेल तर मुस्लीम समाजाने शिक्षणात प्रगती केली पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले होते.
विधानाचे समर्थन
या विधानामुळे त्यांच्यावर मुस्लीमांकडून चहूबाजूंनी टीकेचा वर्षावर होत आहे. विशेषत: अनेक मुस्लीम संघटनांनी त्यांचा कठोर शब्दांमध्ये निषेध केला. तथापि, अजमल हे आपल्या विधानावर ठाम आहेत. शिक्षणात मुस्लीम समाजाची प्रगती झाल्याशिवाय आणि मुस्लीम तरुण शिक्षणाकडे आकर्षित झाल्याशिवाय तरणोपाय नाही. ते जितके शिक्षणापासून दूर राहतील, तितके ते गुन्हेगारीकडे अधिक झुकतील, अशा शब्दांमध्ये त्यांनी आपल्या विधानाचे समर्थनही नंतर केले.
शिक्षणाचा तिरस्कार
मुस्लीम समाजातील आपल्या मुलांना आधुनिक शिक्षण देण्यात उदासीन असतात. आमच्या मुलांकडे शाळेला जाण्यासाठी वेळ नसतो. तथापि, जुगार खेळणे तसेच लोकांची फसवणूक करणे हे त्यांचे आवडते उद्योग आहेत. अशा गुन्हेगारी कामांमध्ये मुस्लीम समाजातील तरुण अधिक संख्येने सहभागी होतात, हे आपल्या समाजाचे सर्वात मोठे दुर्दैव आहे. ही स्थिती केवळ भारतातच आहे असे नाही. जगभरात मुस्लीम समाज शिक्षणात मागे पडत आहे हे मी पाहिले आहे. आमची मुले शिक्षणाचा तिरस्कार करतात. उच्च शिक्षण तर सोडाच, मॅट्रिक होण्याचीही त्यांची तयारी नसते. समाजाला शिक्षणात रस वाटावा म्हणून मला कठोर भाषा करावी लागत आहे, असे स्पष्टीकरणही त्यांनी एका मुलाखतीत दिले आहे.
महिलांचा सन्मान करा
मुस्लीम समाजातील तरुणांनी महिलांचा सन्मान करण्यास शिकले पाहिजे. आमच्या समाजातील कितीतरी तरुण महिलांच्या सोबत गैरव्यवहार करतात हे मी पाहिले आहे. त्यांच्यासाठी माझा एकच संदेश आहे, की त्यांनी महिलांचा सन्मान राखण्यास शिकावे. त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की त्यांच्याही घरांमध्ये महिला आहेत. ते जेव्हा आपल्या माता आणि भगिनींचा विचार करतील तेव्हा त्यांना इतर महिलांसंबंधी आदर वाटल्याशिवाय राहणार नाही. तसेच त्यांच्या मनातील पापबुद्धी नाहीशी होईल. आपण आपल्या मनाशी प्रामाणिक नसतो. त्यामुळे समाजात समस्या कमी होण्याऐवजी वाढत आहेत, अशीही स्पष्टोक्ती त्यांनी केली आहे.
सरकारवर ढकलू नका
मुस्लीम समाजाने आपल्यातील त्रुटींसाठी सरकारला जबाबदार धरु नये. आज लोक चंद्र आणि सूर्यापर्यंत जात आहेत. यात मुस्लीम किती आहेत ? ते तर कारागृहात जाण्यात धन्यता मानतात. त्यांनी ही वृत्ती सोडली नाही, तर संपूर्ण समाजाला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागून मुस्लीमांसंबंधी इतर समाजात अनादर आणि घृणा निर्माण होईल, असा रोखठोक इशाराही त्यांनी दिला आहे.
सुस्पष्ट विधाने
ड मुस्लीम तरुणांनी गुन्ह्यांपेक्षा शिक्षणात अधिक रस घेण्याची आवश्यकता
ड मुस्लीम समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती जास्त
ड केवळ भारतात नव्हे, तर जगभरात मुस्लीम शिक्षणात मागे असल्याचे स्पष्ट
ड मुस्लीम समाज सुधारावा, म्हणूनच मी हे सत्यकथन करत असल्याचा दावा









