कोल्हापूर प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोगाच्यावतीने 27 ऑक्टोबर 2023 रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयांमध्ये प्रारुप यादी प्रकाशित करुन यंदाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरु केला आहे. हा कार्यक्रम 27 ऑक्टोबर ते 09 डिसेंबर 2023 या कालावधीत राबवण्यात येत आहे. 01 जानेवारी 2024 रोजी किंवा त्या आधी 18 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना या कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे. तसेच 2024 च्या एप्रिल, जुलै, ऑक्टोबर या महिन्यांच्या 1 तारखेला 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुण-तरुणींनाही या कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येईल. मात्र त्या अर्जावरील प्रक्रिया या तिमाहीत पूर्ण करण्यात येईल. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मताधिकार बजावण्यासाठी ही संधी महत्वाची असल्याने पात्र नवमतदारांनी नावनोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
प्रारुप मतदार यादीमध्ये आपले नाव असल्याची खात्री मतदारांनी करुन घ्यावी. ऐन मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीत नाही, अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते. तसेच आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ इ. तपशील सुद्धा अचूक आहेत का याचीही खात्री करणे आवश्यक आहे. ज्या मतदारांना या तपशिलामध्ये दुरुस्त्या करायच्या असतील त्यांनी अर्ज क्र. आठ भरावा. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन अर्हता दिनांकावर आगाऊ मतदार नोंदणी करता येते, त्याप्रमाणे एखाद्याच्या नावासंबंधी हरकत सुद्धा घेता येते. एखाद्या मतदारसंघातील एखादा मतदार हा यादीत दिलेल्या पत्त्यावर राहत नसेल, तर अशा नावाबद्दल त्याच मतदारसंघातील अन्य मतदार आक्षेप घेऊ शकतो. त्यामध्ये जर तथ्य आढळून आले तर पडताळणी करुन संबंधित मतदाराच्या नावाची वगळणी केली जाते. मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण होण्यासाठी अशा अपात्र मतदारांची वगळणीही महत्त्वाची असते.
वंचित घटकातील नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरे
वंचित घटकातील नागरिकांची मतदार यादीत अल्प प्रमाणात नोंद असल्याने त्यांच्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 18 व 19 नोव्हेंबर या कालावधीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला व दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी विशेष शिबिरे राबवली जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजना व निवडणूक साक्षरता मंडळ यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. महिलांच्या मतदार नोंदणी शिबिरांसाठी महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ (माविम), महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एसएसआरएलएम) या शासकीय विभागांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. तर दिव्यांगांसाठी कार्य करण्राया सामाजिक संस्थांच्या मदतीने दिव्यांग व्यक्तींची मतदार नोंदणी, त्यांची मतदार यादीतील नोंद चिन्हांकित करणे इ. बाबी केल्या जाणार आहेत. तृतीयपंथी व्यक्ती, शरीरव्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, भटक्या-विमुक्त जमाती यांच्यासाठी 2 व 3 डिसेंबर या दिवशी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. ही शिबिरे सामाजिक संस्थांच्या सहकार्याने या समाजघटकांच्या सोयीच्या ठिकाणी आयोजित केली जाणार आहेत. या समाजघटकांकडे वास्तव्य आणि जन्मतारखेच्या कागदपत्रांची कमतरता लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने त्यांना स्व-घोषणापत्राची सवलत दिली आहे, त्यामुळे समाजातील या व्यक्ती आता कोणतीही कागदपत्रे नसली तरी मतदार नोंदणी करु शकणार आहेत.
विशेष ग्रामसभांचे आयोजन
ग्राम विकास व पंचायतराज विभागाच्या सहकार्याने 1 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत राज्यभर विशेष ग्रामसभेचे आयोजन केले जाणार आहे. या काळात राज्यभरातील ग्रामसभांमध्ये मतदार यादीचे वाचन केले जाईल. या अंतर्गत नव्याने नावनोंदणीस पात्र नागरिक, लग्न होऊन गावात आलेल्या स्त्रिया, गावात कायमस्वरुपी नव्याने वास्तव्यास आलेले नागरिक यांची नावनोंदणी केली जाईल. तसेच दुबार नावे, मृत व्यक्ती, गावातून कायमस्वरुपी स्थलांतरित झालेल्या व्यक्ती, लग्न होऊन अन्य गावात गेलेल्या स्त्रिया यांच्या नावांची मतदार यादीतून वगळणी केली जाईल.
अंतिम मतदार यादीतील मतदार
दिनांक 5 जानेवारी 2023 च्या अंतिम मतदार यादीमध्ये जिल्हयात एकूण मतदारसंख्या 31 लाख 50 हजार 46 इतकी होती. ही मतदार संख्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत 76.42 टक्के इतकी होती. त्यानंतर झालेल्या निरंतर अद्ययावतीकरण प्रक्रियेत मतदार नोंदणी, नाव वगळणी या बाबी सुरुच होत्या. आता 27 ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या प्रारुप मतदार यादीतील एकूण मतदारसंख्या 31 लाख 57 हजार 388 एवढी आहे आणि ही संख्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत 76.11 टक्के इतकी आहे. 37 हजार 720 इतकी नवीन मतदार नोंदणी आहे, तर 30 हजार 378 मतदारांची नावे वगळली गेली आहेत. वगळण्यात आलेली ही नावे दुबार, मयत, कायमस्वरूपी स्थलांतरित या मतदारांची होती. जानेवारी 2023च्या अंतिम मतदार यादीमध्ये पुरुष मतदारसंख्या 16 लाख 12 हजार 957 होती. तर 27 ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार यादीतील पुरुष मतदारसंख्या 16 लाख 13 हजार 715 आहे. तर स्त्राr मतदारांची जानेवारी 2023 मधील संख्या 15 लाख 36 हजार 966 होती, तर ऑक्टोबर 2023 मधील संख्या 15 लाख 43 हजार 535 आहे. जानेवारी 2023 मधील यादीमध्ये एक हजार पुरुषांच्या मागे 953 स्त्रिया होत्या, तर ऑक्टोबरच्या यादीत एक हजार पुरुषांच्या मागे 957 स्त्रिया आहेत. तृतीयपंथी समुदायाची जानेवारी 2023 मधील संख्या 123 होती, ऑक्टोबर 2023 मध्ये 138 इतकी आहे.
युवा मतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी महाविद्यालयांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन
कोल्हापूरच्या लोकसंख्येत 18-19 वयोगटाची टक्केवारी 3.71 (1,54,008) इतकी आहे, पण ऑक्टोबरच्या मतदार यादीत या वयोगटाची टक्केवारी फक्त 1.01 (41,895) एवढी आहे. तर 20-29 या वयोगटाची लोकसंख्येतील टक्केवारी 18.37 (7,62,171) इतकी आहे, पण ऑक्टोबरच्या मतदार यादीत या वयोगटाची टक्केवारी फक्त 14.07 (5,53,795) एवढी आहे. भारत हा तरुणांचा देश आहे. तथापि मतदार यादीतली त्यांची आकडेवारी अल्प आहे. त्यामुळे युवा मतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी महाविद्यालयांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच ‘उत्कृष्ट मतदार-मित्र महाविद्यालय पुरस्कारा‘ चे आयोजनही करण्यात आले आहे. 100 टक्के मतदार नोंदणी केलेल्या आणि मतदार जागृतीचे उपक्रम राबवण्राया महाविद्यालयांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत.नागरिकांनी ‘न्न्दी पत्ज्त्ग्हा Aज्ज्‘ चा जास्तीत जास्त वापर करुन मतदार नोंदणी व दुरुस्ती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित
1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.
मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचे वेळापत्रक
दावे व हरकती सादर करण्यासाठी- 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर 2023. तसेच विशेष शिबीर अंतर्गत महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांसाठी- मंगळवार 7 नोव्हेंबर 2023. महिला व दिव्यांग व्यक्तींसाठी – शनिवार 18 नोव्हेंबर व रविवार 19 नोव्हेंबर 2023. तृतीयपंथी, शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांसाठी – शनिवार 2 डिसेंबर व रविवार 3 डिसेंबर 2023. तर सर्वसामान्य मतदार नोंदणीसाठी शनिवार 4 नोव्हेंबर व रविवार 5 नोव्हेंबर 2023 रोजी विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. दावे व हरकती निकाली काढण्यासाठी मंगळवार 26 डिसेंबर 2023 पर्यंतची तारीख आहे. तर अंतिम मतदार यादी सोमवार 5 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध केली जाईल.
2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मताधिकार बजावण्यासाठी मतदार यादीत नाव नोंदणी करणे महत्वाचे असल्याने पात्र नवमतदारांनी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात नावनोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रेखावार यांनी केले आहे.