वेंगुर्ले(वार्ताहर)-
वेंगुर्ले तालुक्यात आमदार तथा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विविध अंगे व सर्वसामान्यांना आवश्यक असणाऱ्या अशा विकास कामांचा धडाका सुरू केल्याने व आत्ताच वेंगुर्ले शहरात 3 कोटी 36 लाख 83 हजार रकमेचा निधी दिल्याने शहरातली महत्त्वपूर्ण कामे मार्गी लागणार आहेत अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी वेंगुर्लेत आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
वेंगुर्ले शहरातील सप्तसागर कॉम्प्लेक्स मधील वेंगुर्ले तालुका शिवसेना संपर्क कार्यालयात अलीकडेच 3 कोटी 36 लाख 83 हजार एवढ्या रकमेचा निधी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंजूर केल्या संदर्भातील माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी आयोजित केली होती. याप्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यात वेंगुर्ले तालुका शिवसेनाप्रमुख नितीन मांजरेकर, जिल्हा संघटक सुनील मोरजकर, तालुका संघटक बाळा दळवी, मितेश परब, युवा शहर प्रमुख संतोष परब, बाळू सावंत यांचा समावेश होता.
सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर पुढे म्हणाले, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे शालेय शिक्षण कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी सर्वसामान्य जनतेने सुचविलेली व अत्यावश्यक असणारी विविध विकास कामे प्राधान्याने निधी देऊन पूर्ण केलेली आहेत. तसेच रुग्ण वाहिकेमुळे होणारी समस्या जाणून दोडामार्ग, शिरोडा व वेंगुर्ले शहर यासाठी 3 शिवसेनेच्या माध्यमातून दिपक केसरकर हे दि. 30 रोजी तिन्ही रुग्णवाहिकांचे लोकार्पण करणार आहेत. याबरोबरच चालू आठवड्यात वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील कँम्प येथील शिवाजी प्रागतिक शाळेच्या ठिकाणी वयोवृद्ध व्यक्तींसाठी विरंगुळा केंद्रासाठी 1 कोटीचा निधी, शहरातील रस्त्यावर स्ट्रीट लाईटच्या नवीन पोल व नवीन लाईट याकरिता 1.50 कोटी तसेच असंख्य वर्षाचा पत्र्याचा पूल जो जीर्ण झाला आहे. तो वाहतुकीस सुसज्ज असा व्हावा, याकरिता 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला असून हि कामे 3 कोटी 36 लाख 83 हजार रुपयांची आहेत. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विकासकामे धडाकेबाज करण्याच्या कार्यक्रमांना प्रभावित होऊन येत्या दि. 30 ऑक्टोबरला वेंगुर्ले येथील स्वामिनी मंगल कार्यालय येथे सकाळी 10 वाजता आयोजित केलेल्या कार्यक्रमात वेंगुर्ले तालुक्यातील विविध पक्षाचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.









