बारा कलशांमध्ये मातीचा समावेश : आझाद मैदानावर विधीवत पूजन
पणजी : ‘मेरी माटी, मेरा देश’ मोहिमेसाठी गोवा राज्याच्या 12 ब्लॉकचे माती कलश राष्ट्रीय राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल येथील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हिरवा झेंडा दाखविला. तत्पूर्वी ब्राम्हणाच्या हस्ते मातीचे पुजन करण्यात आले. नंतर ख्रिश्चन व मुस्लिम धर्मगुऊंनी पुजन केले. मान्यवरांच्या हस्ते ते कलश नेहरू युवा केंद्राच्या प्रतिनिधींकडे देण्यात आले. हे प्रतिनिधी गोव्याच्या मातीचे कलश दिल्लीपर्यंत घेऊन जाणार आहेत.पंचायत संचालनालयातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह पर्यटनमंत्री रोहन खंवटे, पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, आमदार राजेश फळदेसाई, संकल्प आमोणकर, उल्हास तुयेकर, देविया राणे, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात, नेहरू युवा केंद्राचे अधिकारी व प्रतिनिधी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकासाठी माती
देशाच्या तसेच राज्याच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी हौतात्म्य पत्करले त्यांच्या आठवणी जागृत ठेवणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. या हुतात्म्यांची आठवण पुढील कित्येक पिढ्यांनी काढावी म्हणून राजधानी दिल्ली येथे नव्याने उभारलेल्या संसद भवनासमोर हुतात्म स्मारक उभारले जाणार आहे. त्याची पायभरणी करतांना संपूर्ण देशातील माती त्यात घातली जाईल. गोव्याची माती स्मारकात घातली जाणार आहे. गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी हौतात्म्य पत्करले आहे, त्यांना देशाच्या राजधानीत दिल्लीत स्थान मिळणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
‘मेरी माटी, मेरा देश‘ अभियान
भारत देशात अनेक भाषा असतील अनेक जाती धर्माचे लोक असतील मात्र आपला भारत एक आहे. ती एकता राखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून साकारलेली ही सुंदर संकल्पना आहे. याची सुऊवात ‘मेरी माटी, मेरा देश‘ या कार्यक्रमातून 12 मार्च 2021 रोजी साबरमती येथून दांडी यात्रेने झाली आहे. आपल्याला त्यात सहभागी होण्याची संधी मिळाली होती, असे मुख्यमंत्री म्हणाले.
एकता यात्रेत सहभागी व्हावे
येत्या 31 ऑक्टोबर रोजी एकता दिन देशभरात साजरा करण्यात येणार असून गोव्यातही पंचायत स्तरावर एकता रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. यावेळी पंचायतमंत्री माविन गुदिन्हो म्हणाले की आज जगात अनेक घडामोडी घडत आहेत. अनेक देशांवर विविध प्रकारची संकटे येत आहेत, मात्र आपले पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वातून आपला देश दिवसेंदिवस अधिकधिक सक्षम, कणखर आणि प्रगतशिल बनत आहे. अशाच नेत्याची भारताला खरी गरज होती आणि यापुढेही आहे. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुऊवात करण्यात आली. त्यानंतर गणेश वंदना करून ज्ञानज्योती महिला मंडळ सत्तरी यांनी समई नृत्य व फुगडीचे कार्यक्रम केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी उपाध्ये यांनी केले.









