महापालिकेतील आरोप-प्रत्यारोपांचे पडसाद
बेळगाव : महानगरपालिकेच्या राजकारणात सत्ताधारी व विरोधी गटात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर महापौर शोभा सोमनाचे व सत्ताधारी नगरसेवकांनी शुक्रवारी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेऊन त्यांच्याकडे पालकमंत्र्यांविरुद्ध तक्रार केली. विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी शुक्रवारी राज्यपाल बेळगावला आले होते. विद्यापीठाच्या अतिथीगृहात महापौर शोभा सोमनाचे व सत्ताधारी नगरसेवकांनी राज्यपालांची भेट घेऊन पालकमंत्री सतीश जारकीहोळी हे पालिकेच्या कारभारात हस्तक्षेप करीत आहेत. मनपा बरखास्त करण्याचे सांगत आहेत, अशी तक्रार करण्यात आली. महापौरांनी केलेल्या तक्रारीनंतर राज्यपालांनी स्थानिक अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. महानगरपालिकेत सध्या सुरू असलेल्या घडामोडींसंदर्भात जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा व महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्याशी चर्चा करून राज्यपालांनी माहिती घेतली आहे.









