न्यायालयीन कोठडीत 10 नोव्हेंबरपर्यंत वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली मद्य धोरणप्रकरणी अटक करण्यात आलेले आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना 10 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दिल्ली अबकारी धोरण प्रकरणी त्यांना ईडीने 4 ऑक्टोबर रोजी अटक केली होती. शुक्रवारी कोठडीची मुदत संपत असतानाच त्यांना दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी तपास यंत्रणांनी त्यांच्या कोठडीत आणखी वाढ करण्याची केलेली मागणी न्यायालयाने मंजूर केल्याने त्यांना धक्का बसला आहे.
संजय सिंह न्यायालयात हजर होण्यापूर्वी आप कार्यकर्त्यांनी संजय सिंह यांच्या सुटकेची मागणी करत निदर्शने केली. आंदोलक भाजप कार्यालयाकडे मोर्चा वळवणार होते, मात्र पोलिसांनी त्यांना अडवून ताब्यात घेतले. याआधी या प्रकरणाची सुनावणी 13 ऑक्टोबरला झाली होती. त्यावेळी न्यायालयाने 27 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तसेच दुसरीकडे, यापूर्वी 20 ऑक्टोबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने संजय सिंह यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.
केंद्रीय एजन्सीने त्यांच्या निवासस्थानाची झडती घेतल्यानंतर राज्यसभा खासदार संजय सिंह यांना ईडीने 4 ऑक्टोबर रोजी अटक केली होती. 5 ऑक्टोबर रोजी त्यांना 10 ऑक्टोबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांच्या कोठडीत 13 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली होती.









