वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नेस्ले इंडिया नजीकच्या भविष्यात उत्पादनांच्या किमती कमी करण्याचा विचार करणार नाही. नेस्ले इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश नारायणन यांनी गुंतवणूकदारांना उत्तर देताना सांगितले की, ‘ महागाई कमी झाली असली, तरी गहू, दुधासह वस्तूंचे भाव अजूनही चढेच असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
मागील तिमाहीत कंपनीने केलेल्या किंमती वाढीबाबत विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. नारायणन म्हणाले, ‘मूल्याच्या दृष्टीने आमच्या पोर्टफोलिओपैकी जवळपास अर्धा भाग यात समाविष्ट आहे. मॅगी नूडल्स आणि किटकॅट चॉकलेट बनवणाऱ्या कंपनीने 19 ऑक्टोबर 2023 रोजी तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. कंपनीने वार्षिक आधारावर निव्वळ नफ्यात 37.28 टक्के वाढ नोंदवली आहे. कंपनीची निव्वळ विक्री 9.4 टक्क्यांनी वाढून 5,009.5 कोटी रुपये झाली आहे.
मागील सात वर्षात 125 नवी उत्पाने
नारायणन म्हणाले, आम्ही गेल्या सात वर्षांत 125 नवीन उत्पादने बाजारात आणली आहेत. अल्पावधीत कंपनीच्या 10 नवीन प्रकल्पांवर काम सुरू आहे. नारायणन यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, विक्रीतील नावीन्यपूर्ण योगदान 6 टक्क्यांहून अधिक आहे आणि दीर्घकालीन ते 10 टक्क्यांपर्यंत नेण्याचे ध्येय असल्याचेही सांगितले आहे.









