उपग्रहाद्वारे दुर्गम भागात हायस्पीड इंटरनेट प्रदान करणार : इंडिया मोबाइल काँग्रेस 2023 कार्यक्रमास प्रारंभ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
प्रगती मैदान, दिल्ली येथे सुरू असलेल्या ‘इंडिया मोबाइल काँग्रेस 2023’ कार्यक्रमात ‘जिओ स्पेस फायबर’ तंत्रज्ञान रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी सादर केले. जिओच्या या तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागात हाय-स्पीड इंटरनेट उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. इंडिया मोबाईल काँग्रेसचा कार्यक्रम 27 ते 29 ऑक्टोबर दरम्यान दिल्लीतील प्रगती मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये विविध उत्पादने असणारे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.
प्रगती मैदानातील पहिला स्टॉल जिओ इन्फोकॉमचा आहे. आकाश अंबानी यांनी पंतप्रधान मोदींना जिओ एअर फायबर, स्पेस फायबर आणि इतर तंत्रज्ञानाची माहिती दिली. जिओ भारत डिव्हाईसदेखील येथे प्रदर्शित करण्यात आले.
आकाश अंबानी यांनी पंतप्रधान मोदींना जिओ स्पेस फायबर टेक्नॉलॉजीची माहिती दिली. जिओ स्पेस फायबर देशभरात परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध असणार आहे.
जिओ स्पेस फायबर हे उपग्रह आधारित गिगा फायबर तंत्रज्ञान आहे, जे फायबर केबलद्वारे ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीअंतर्गत अत्यंत दुर्गम भागातही प्रदान करणे शक्य होणार आहे. तसेच जिओ स्पेस फायबर सेवा देशभरात अतिशय वाजवी दरात उपलब्ध करून दिली जाणार आहे.
चार अतिदुर्गम ठिकाणे जोडणार
यामध्ये पहिले क्षेत्र गीर (गुजरात), कोरबा (छत्तीसगड), नबरंगपूर (ओडिशा) आणि जोरहाट (आसाम) आहेत. या सेवेसाठी सॅटेलाइट टेलिकम्युनिकेशन (एसईएस) कंपनीचे उपग्रह वापरण्यात येणार आहेत.
जिओ स्पेस फायबर प्रति सेकंद 1 जीबीपर्यंत गती प्रदान करण्यास सक्षम आहे.
हे तंत्रज्ञान मोडेमला जोडलेल्या सॅटेलाइट रिसीव्हर डिशद्वारे इंटरनेट प्रसारित करण्यासाठी रेडिओ लहरींचा वापर करते. हे तंत्रज्ञान 1जीबी प्रति सेकंदापर्यंत इंटरनेटचा वेग देण्यास सक्षम आहे. जिओ फायबर आणि जिओ एअर फायबर नंतर रिलायन्स जिओच्या कनेक्टिव्हिटी पोर्टफोलिओमधील हे तिसरे मोठे तंत्रज्ञान आहे.
जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी जिओ स्पेस फायबरवर काय म्हणाले?
रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे अध्यक्ष आकाश अंबानी म्हणाले, ‘जिओने प्रथमच भारतातील लाखो घरे आणि व्यवसायांना ब्रॉडबँड इंटरनेट प्रदान केले. जियो स्पेस फायबरसह आम्ही लाखो अनकनेक्टेड लोकांना कव्हर करू. जिओ स्पेस फायबर सर्वांना, सर्वत्र ऑनलाइन सरकारी, शिक्षण, आरोग्य आणि मनोरंजन सेवांशी जोडण्यात सक्षम असेल.









