जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक : केपीएससी परीक्षेवेळी काटेकोरपणे नियम पालनाचा आदेश
बेळगाव : विविध नियुक्त्यांसाठी जिल्ह्यात दि. 28 व 29 ऑक्टोबर रोजी परीक्षा होणार आहेत. प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची मार्गसूचीनुसार सुरक्षितपणे वाहतूक करण्याबरोबरच एकूण परीक्षा प्रक्रिया सुसूत्रपणे चालावी यासाठी प्रत्येकाने जागरुकपणे कार्य करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली आहे. कर्नाटक परीक्षा केंद्राच्यावतीने होणाऱ्या या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी जिल्हा पंचायत सभागृहात पूर्वतयारी बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षपदावरून बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना वरील सूचना केल्या. स्वीय साहाय्यक, ज्येष्ठ साहाय्यक, प्रथम दर्जा साहाय्यक आदी विविध हुद्द्यांसाठी परीक्षा होणार आहेत. दि. 28 ऑक्टोबर रोजी बेळगाव येथील 20 परीक्षा केंद्रांवर 8789 विद्यार्थी व 29 ऑक्टोबर रोजी 30940 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत परीक्षेच्या काळात गोंधळ होऊ नये, प्रत्येकाने आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, परीक्षेनंतर मार्गसूचीनुसार उत्तरपत्रिकांची सुरक्षितपणे नियोजित ठिकाणी रवानगी करावी. कामचुकारपणा आढळून आल्यास कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.
परीक्षांसाठी नियुक्ती झालेल्यांनी जबाबदारी हलक्याने घेऊ नये. परीक्षार्थींची तपासणी, सुरक्षा, वेळेचे नियोजन आदींबाबत जागरुकता बाळगावी. प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. परीक्षार्थींनीही वेळ पाळावी, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले. या बैठकीत बोलताना पदवीपूर्व शिक्षण खात्याचे उपसंचालक एम. एम. कांबळे म्हणाले, परीक्षा केंद्रांवर कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस आणता येणार नाही. मंगळसूत्र वगळता कर्णफुले, नथ आणि इतर दागिने घालण्यासही परीक्षेच्या काळात बंदी आहे. हिजाब परिधान करणाऱ्यांनी किमान अर्धा तास परीक्षा केंद्रावर हजर रहावे. त्यांच्यासाठी स्वतंत्र तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रावरील प्रवेशद्वारावरच व्हिडिओग्राफी करावी. परीक्षा केंद्रात व्हिडिओग्राफी करता येणार नाही. सर्व सीसीटीव्ही कार्यरत राहतील, याची दक्षता घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. यावेळी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी शुभम शुक्ला, पदवीपूर्व शिक्षण खात्याचे चिकोडी विभागाचे उपसंचालक पी. आय. भंडारी यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.









