विचारवंत पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचा परखड सवाल : दुर्गादौडच्या सांगता समारंभात व्यक्त केले विचार
बेळगाव : या देशात सर्वाधिक जमिनी रेल्वे, लष्कर आणि त्यानंतर वक्फ बोर्डाकडे आहेत. परंतु, या बोर्डाला कोणी प्रश्न करू शकत नाही. वक्फ प्रॉपर्टी अॅक्टला संसदेने सर्वाधिक महत्त्व दिले. या कायद्यामुळे यावर कोणीही आवाज उठविणार नाही. कारण ही खासगी संस्था आहे, ती सरकारी नाही. या देशातील दलालांनी आणि ठेकेदारांनी सरकारचे तोंड बंद केल्याचे परखड विचार पत्रकार तसेच ज्येष्ठ विचारवंत पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी दुर्गामाता दौडच्या सांगता समारंभात बोलताना व्यक्त केले. मी कोणत्याही सरकारची स्तुती करत नाही आणि कोणत्याही पक्षाच्या विचारधारेचा अनुयायी नाही. परंतु, या देशात स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरची परिस्थिती आणि त्यातील तथ्यांश जाणून घेणे महत्त्वाचे आहे. मी आज अशा भूमीवर बोलतो आहे, जेथे हजारो ‘शेर आणि शेरनीया’ उपस्थित आहेत. आजही युपीएससीच्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवरायांबद्दल चुकीची माहिती प्रसिद्ध केली जाते. तेव्हा तुम्ही त्यावर आवाज उठवून प्रश्न विचारायला हवेत, असे आवाहन त्यांनी केले.
आजपर्यंत या पुस्तकातील मजकूर कोणत्याही देशाच्या सरकारने बदलण्यासाठी आग्रह धरला नाही. त्यामुळे जेव्हा समाजच असा आग्रह धरेल आणि सरकारसमोर उभे राहील, तेव्हाच तो मजकूर सरकार बदलू शकते. ‘सर्व धर्म समान आहेत’ या इतके खोटे विधान नाही. यावर प्राध्यापक, विद्वान खरे बोलू शकत नाहीत. धर्माचा अर्थ मठांनी किंवा प्राध्यापकांनी सांगितलेलाच नाही. आपली परंपरा, आपले आदर्श आणि संस्कार सांगतात की धर्म म्हणजे कर्म. एका आईचा, मुलीचा, राजाचा, डॉक्टरचा, इंजिनियरचा धर्म काय आहे? हे आपण लक्षात घ्यायला हवे. सनातनी हिंदू सनातनी शब्दांचे अर्थ जाणून व्यवहार करत असता तर काश्मीरमध्ये हिंदू पंडितांची हत्या झाली नसती. परंतु, त्यासाठी कोणीच लढले नाही. प्रत्येक जण आपापली दुकानदारी चालवत आहे. पाच लाख पंडितांना भारत सोडावा लागला. पण कोणीही हिंदू त्यांना वाचवण्यास आला नाही. तुमच्या पूर्वजांना कोणी खरेदी करू शकले नाही. मात्र, तुम्ही कसे विकले गेलात? असा प्रश्न या ठेकेदारांना विचारायला हवा. आज रामराज्य किंवा रामाच्या नावावरून गदारोळ उठविला जातो. रावणसुद्धा ब्राह्मण होता. त्याच्या एका चुकीचे प्रायश्चित म्हणून रामाने त्याचा वध केला. परंतु, रामावर ब्राह्मण वधाचा आरोप होत नाही. परशुरामही ब्राह्मण होते. जन्माने कोणी ब्राह्मण किंवा अन्य कोणी ठरू शकत नाही. ज्याने ज्ञान प्राप्त केले, तो ब्राह्मण आहे. जो आपल्या आईचे, घराचे, जिल्ह्याचे रक्षण करतो, तो क्षत्रिय आहे. जो व्यवहार करतो, तो व्यापारी आहे. म्हणूनच आजसुद्धा एक मर्यादा ओलांडल्याने रावणाचे दहन होते आणि परशुराम व रामाची पूजा केली जाते, हे लक्षात घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
वक्फ बोर्डाला अवाजवी अधिकार
आपल्या देशातील पोलीस यंत्रणा आजही ब्रिटिशांच्या कायद्याने बांधिल आहे. 1860 मध्ये जो ‘एव्हिडन्स अॅक्ट’ झाला, तोच आजही लागू आहे. जातीपातीचे राजकारण करून देश लुटला जात आहे. वक्फ बोर्डाचे दोन लोक जरी म्हणाले की, ही आमची जमीन आहे तर आपल्याला न्यायालयात जाता येत नाही, इतकी ताकद सरकारने त्यांना दिली आहे. पण संसदेत हा कायदा झाला, तेव्हा कोणी एकानेही त्याविरुद्ध आवाज उठविला नाही, असे कुलश्रेष्ठ म्हणाले.









