केएससीए 14 वर्षाखालील आंतर क्लब क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघाटना मान्यता प्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित 14 वर्षाखालील आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेच्या गुरूवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातून टॅलेंट स्पोर्ट्स क्लब हुबळी अ संघाने हुबळी क्रिकेट अकादमी संघाचा 144 धावांनी तर अमृत पोतदार सीसीए संघाने निना स्पोर्ट्स संघाचा 4 गड्यांनी पराभव करून उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. साईराज चव्हाण (पोतदार) व अभिषेक एस. यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. हुबळी येथील केएसए मैदानावर घेण्यात आलेल्या सामन्यात टॅलेंट स्पोर्ट्स हुबळी संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 गडी बाद 256 धावा केल्या. त्यात अभिषेक एस. ने 14 चौकाराच्या सहाय्याने 102 धावा करून शतक झळकविले त्याला जॉय जेम्स सोल्लदने 8 चौकारासह 80, अभिनव शर्माने 4 चौकारासह 22, श्रीकांत बी.ने 13 धावा केल्या. हुबळी क्रिकेट अकादमीतर्फे अभिषेक गणीने 43 धावात 3, आकाशगौडा पाटील 40 धावात 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना हुबळी क्रिकेट अकादमी अ संघाचा डाव 30. 2 षटकात 112 धावात आटोपला. त्यात मोहिन मुल्लाने 3 चौकारासह 25, यशवर्धने 2 चौकारासह 19, आयान शेखने 13 तर सय्यद अफनाने 11 धावा केल्या. टॅलेंटतर्फे अभिनन शरनने 14 धावात 4, संदेश व्ही. 2, तर हर्षवर्धक व अभिषेक यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. बेळगावच्या केएससीए मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात निना स्पोर्ट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 गडी बाद 153 धावा केल्या. त्यात सिध्दांत पाटीलने 7 चौकारासह 56, अबरार कादीरने 4 चौकारासह 24, हर्ष जाधवने नाबाद 18, मयन नाबाद 16, तर जियानने 15 धावा केल्या. अमृत पोतदारतर्फे आर. ए. शेट्टीने 22 धावात 3, विराज पाटीलने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना अमृत पोतदार संघाने 48. 1 षटकात 6 गडीबाद 154 धावा करून सामना 4 गड्यांनी जिंकला. त्यात साईराज चव्हाणने 5 चौकारासह 48, विनायक सानुरकरने 5 चौकारासह 32, सिध्दार्थ अधिकारीने 15 धावा केल्या. निनातर्फे अबरार कादीरने 27 धावात 4 गडी बाद केले.









