अध्याय एकोणतिसावा
उद्धवाला ब्रह्मज्ञान झाल्याने त्याचा सर्व संदेह नष्ट झाला ह्या कल्पनेने भगवंत सुखावले. उद्धवाची ब्रह्मज्ञान मिळवण्याची कळकळ भगवंतांनी जाणली होती. त्यामुळेच त्यांनी त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला होता. त्याप्रमाणे त्याने इतरांनाही उपदेश करावा ह्या उद्देशाने भगवंतांची इच्छा होती. अर्थातच सर्वच शिष्य ब्रह्मज्ञान मिळवण्याचे अधिकारी नसतात, हे लक्षात घेऊन, उद्धवाने शिष्याची योग्यता पाहून त्याला ब्रह्मज्ञानाचे दान करावे ह्या दृष्टीने योग्य शिष्यांची पारख कशी करावी ह्याबद्दल भगवंत उद्धवाला सविस्तर माहिती देऊ लागले. ते म्हणाले, तुला तर ब्रह्मज्ञान प्राप्त झाले पण ते कुणाला देण्याआधी तो ते घेण्यासाठी पात्र आहे की नाही ह्याची खात्री करून घे. त्यासाठी पात्र शिष्य कसे ओळखावेत हे सांगतो. त्याआधी अपात्र शिष्यांच्या ठायी कोणते दुर्गुण असतात ते सांगतो. ह्यानिमित्याने दुर्गुणांची एक मोठ्ठी यादीच भगवंत सांगत आहेत. त्यामागे त्यांचा असा उद्देश आहे की, शिष्यांनी, साधकांनी, भक्तांनी त्यांच्यातले दुर्गुण हेरून ते नाहीसे करण्याचा प्रयत्न करावा. अर्थात हे दुर्गुण सहजासहजी जाण्यासारखे नसतात. त्यासाठी सद्गुरूंची भक्ती मनापासून करावी. सद्गुरूंची भक्ती म्हणजे त्यांची शारीरिक सेवा नव्हे तर त्यांचा उपदेश प्रत्यक्षात आचरणात आणणे. भगवंत पुढे म्हणाले, उद्धवा, नास्तिक, दंभयुक्त, अभक्त, दुर्वर्तन करणाऱ्या शिष्यांना हे ज्ञान देऊ नये. ज्यांना धन आणि सन्मान मिळावा अशी अतिशय हाव असते ते दांभिक असतात. ते केवळ माझे भजन करत असल्याचा देखावा करत असतात पण मनातला भाव वेगळाच असतो. त्यांचे हत्तीप्रमाणे खायचे आणि दाखवायचे दात वेगळेच असतात. अशा मंडळींना हे एकादश स्कंधाचे ज्ञान स्वप्नातही देऊ नये. अशा मंडळींचे स्वरूप तुला सांगतो. ह्यांना ऐहिक गोष्टींबद्दल मोह असतो आणि स्वत:च्या देहाबद्दल ममता असते, स्वत:च्यापुढे ते कुणाचे महत्त्व किंवा अस्तित्व मानायला तयारच नसतात. त्यांना स्वत:च्या आत्मस्वरुपाच्या अस्तित्वाबद्दल काहीही खात्री नसते. तसेच वेदशास्त्राबद्दल बिलकुल आस्था नसते. मुळात देव आहे हेच त्यांना मान्य नसते. त्यांच्यावर असलेल्या नास्तिक्यवादाच्या प्रभावामुळे ब्रह्मज्ञान हे त्यांच्या दृष्टीने जनावरांच्यापुढे ठेवलेल्या कोंड्यासमान असते. मनात कोणताही भाव नसल्याने ते त्या ब्रह्मज्ञानाला तोंड लावायलासुद्धा तयार होत नाहीत. त्यांच्या नास्तिक्यवादापुढे ब्रह्मज्ञान बिचारे बापुडे होऊन जाते. अशा अनीश्वरवाद्यांचा त्याग करावा. ज्यांना अनन्यताच माहित नसते ते अनन्यभावाने शरण येण्याऐवजी ते गोडगोड भाषेत, मोठमोठ्या गप्पा मारत असतात. धूर्तपणाने बोलून हे ब्रह्मज्ञान मिळवण्याचा त्यांचा उद्देश असतो. त्या ज्ञानाचे भांडवल करून त्याचा उपयोग स्वत:चे महत्त्व वाढवण्यासाठी करायचा त्यांचा विचार असतो. काया, वाचा, मन आणि धन ह्या सर्व बाबतीत ते गुरूची जाणूनबुजून फसवणूक करत असतात. अशा ठक मंडळींना पिटाळून लावावे. सद्गुरूंच्यामधील गुणदोष हुडकणे ह्यांना फार आवडते. मी एव्हढा महान असताना मी गुरुसेवा कशाला करू असा विचार करून ते सद्गुरूसेवा करायचे टाळतात. स्वत: उच्चासनावर बसून सेवकांकडून गुरुसेवा करून घेतात. त्यांचे दांभिकपण लक्षात घ्यावे. जे सद्गुरूंपाशी स्वत: किती महान आहोत हे सांगून त्यांचा गवगवा करतात त्यांना गर्व झालेला असल्याने ते सद्गुरूंची सेवा करत नाहीत. मी दानशूर असून अतिशय सामर्थ्यवान आहे ह्या विचाराने गर्विष्ठ झाल्याने, ते हलकीसलकी कामे करत नाहीत. काही शिष्य ते सद्गुरुसेवा करत असलेले पाहून लोक मला काय म्हणतील ह्या विचाराने सद्गुरूसेवा करायचे टाळतात. अशा मंडळींना त्यांच्या प्रतिष्ठेचा अतिअभिमान असतो.
क्रमश:








