पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुमारे 7, 500 कोटी रूपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. तसेच महाराष्ट्रातील 86 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा शुभारंभ या दौऱ्यात करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आदल्या दिवशी शिर्डीत आगमन झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी थेट शरद पवारांवर आरोप करून शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं ? असा प्रश्न विचारला.
पंतप्रधान मोदींनी निळवंडे धरणावर जलपूजन करून धरणातून निघालेल्या कालव्याचे जाळे देशाला समर्पित केले. याच बरोबर महाराष्ट्रातील अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटलच्या माता आणि बाल आरोग्य शाखेची पायाभरणीही पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज महाराष्ट्रातील शिर्डी येथे सुमारे 7,500 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पाचे उद्घाटन केले. यावेळी जनसमुदायासमोर बोलताना पंतप्रधान मोदींनी कृषी क्षेत्रामध्ये केंद्र सरकार राबवलेल्या आणि ‘ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारांना मदत करण्यासाठी आम्ही अनेक उपाययोजना केल्या असल्याचे सांगितले. “गेल्या नऊ वर्षांत आम्ही 70,000 कोटी रुपयांचे इथेनॉल खरेदी केले आहे. ज्यामुळे थेट साखर कारखानदार आणि ऊस उत्पादकांना याची मदत झाली.” असे त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला सांगितले.
व्यासपीठावर उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर पंतप्रधानांनी शरद पवार यांचे नाव न घेता जोरदार टिका केली. यावेळी ते म्हणाले, “महाराष्ट्रातील काही लोकांनी आजपर्यंत शेतकऱ्यांच्या नावावर फक्त राजकारण केले आहे. महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्याने देशाचे कृषिमंत्री म्हणून काम पाहिले. मी वैयक्तिकरित्या त्यांचा आदर करतो, पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? पूर्वी शेतकऱ्यांना पीक विकून पैसे मिळवण्यासाठी एजंटांवर अवलंबून राहावे लागत होते. आज आमचे सरकार थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करते.” असेही ते म्हणाले.