पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन : केंद्रीय मंत्र्यांसह 24 मुख्यमंत्र्यांची उपस्थिती,बारा हजार खेळाडूंचा विश्वविक्रमी सहभाग
मडगाव : फातोर्डा येथील पं. जवाहरलाल नेहरू स्टेडियम 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनासाठी सज्ज झाले आहे. आज गुरूवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे दिमखादार उद्घाटन होणार आहे. या सोहळ्याला केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर तसेच इतर केंद्रीय मंत्री, नेते आणि 24 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. सोहळ्यात विविध राज्यांतील व केंद्रशासित प्रदेशांतील बारा हजार खेळाडू सहभागी होतील. तब्बल 600 कलाकार यावेळी स्टेडियममध्ये राष्ट्रीय एकात्मता कार्यक्रम सादर करणार आहेत.
गोव्यात पहिल्यांदाच होत असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन सोहळ्याची प्रतिक्षा सर्वांना लागून राहिली होती. अखेर तो ऐतिहासिक सोहळा आज गुरूवारी होत आहे. गेले काही दिवस या उद्घाटन सोहळ्याची युद्ध पातळीवर तयारी सुरू होती. सोहळा भव्य व्हावा तसेच एकंदरीत क्रीडा स्पर्धा यशस्वी व्हावी, यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व क्रीडामंत्री गोविंद गावडे रोज जातीने लक्ष घालत होते. त्यांनी सातत्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आढावा बैठका घेतल्या व त्यांना मार्गदर्शन केले. अनेक अधिकारी, कर्मचारी दिवसा तसेच रात्री उशिरापर्यंत काम करत होते. उद्घाटन सोहळ्यात आणि संपूर्ण स्पर्धेत कोणतीच कसर राहू नये, याची दक्षता घेतली जात आहे. पोलिसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाची रंगीत तालिम बुधवारी संध्याकाळी पुन्हा एकदा घेतली. त्याचबरोबर दाबोळी विमानतळ ते फातोर्डा स्टेडियमपर्यंतच्या मार्गावरील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यात आली.
पंतप्रधानांच्या मार्गावर कडक सुरक्षा
पंतप्रधानांचे दाबोळी आतंरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर गुरूवारी संध्याकाळी 6 वा. वेर्णामार्गे फातोर्डा स्टेडियमकडे रवाना होतील. या मार्गावरील संभाव्य धोका लक्षात घेऊन या मार्गाची बारकाईने तपासणी करण्यात आली आहे. स्टेडियमच्या परिसरात पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा जेथून जाणार आहे, त्या भागाची सुरक्षा अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली आहे. उद्घाटन सोहळ्यासाठी पंतप्रधानांच्या आगमनापूर्वी आणि सोहळ्यानंतर जाण्यापूर्वी काही वेळ रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान एक तास 50 मिनिटे हजर राहतील, अशी माहिती देण्यात आली आहे.
क्रीडामंत्र्यांचा आढावा बैठकांचा सपाटा
उद्घाटन सोहळ्याच्या तयारीसंबंर्धात क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी बुधवारी आयोजन समितीच्या सदस्यांसोबत अनेक बैठकांचा सपाटा लावला होता. उद्घाटन सोहळ्याची रूपरेखा निश्चित करण्यात आली. हा सोहळा दिमाखदार व्हावा यासाठी बारकाईने व्यवस्थापन करण्यात आलेले आहे. सोहळ्यात सहभागी होणारे प्रतिनिधी, स्पर्धंक, कलाकार, क्रीडापटू तसेच प्रेक्षक आणि क्रीडाप्रेमी यांच्या प्रवेशाचे मार्गही ठरविण्यात आले आहेत. व्यवस्था आणि प्रवेशद्वारांचीही निश्चिती करण्यात आलेली आहे नियोजित कार्यक्रमासाठी कलाकारांनी दोन वेळा सराव केला असून वेशभूषेसह पुन्हा सराव केला. तसेच संगीताचाही सराव करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी 6.30 वा. स्टेडियमवर येणार असले तरी 4.15 ते 4.20 च्या सुमारास प्रत्यक्ष कार्यक्रमांना सुरुवात होईल. उद्घाटन सोहळ्यापूर्वी आणि नंतरही विशेष कार्यक्रम पाहण्याची संधी उपस्थितांना मिळणार आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना दुपारनंतर सुटी
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आज गुरुवारी होत असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून आज राज्यातील सर्व सरकारी कार्यालयाना अर्धा दिवस (दुपारनंतर) सुटी देण्यात आली आहे. तसा निर्णय सरकारने घेतला असून तसे परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार राज्यातील सर्व सरकारी कार्यालये दुपारी 1 नंतर बंद राहणार आहेत. अत्यावश्यक सेवांना हा निर्णय लागू नाही. ही अर्धा दिवस सुटी फक्त सरकारी कार्यालयांसाठी आहे, खासगी कार्यालये, कर्मचारी यांच्यासाठी नाही.
गोव्याने दर दोन वर्षांनी ही स्पर्धा घ्यावी : पी. टी. उषा
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उत्तम नियोजन गोव्यात दिसून येत आहे. अशा स्पर्धा नव्या खेळाडूंना घडवण्यास साह्यभूत ठरत असतात. त्यामुळे गोव्याने दर दोन वर्षांनी राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करावे, अशी अपेक्षा जागतिक दर्जाच्या भारतीय धावपटू तसेच भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या चेअरमन पी. टी. उषा यांनी व्यक्त केली आहे. गोव्याचे नियोजन उच्च दर्जाचे, उत्कृष्ठ असून खेळाडूंसाठी ही आनंदपर्वणी आहे. या संधीचा गोमंतकीय खेळाडूंनी, क्रीडाप्रेमींनी आनंद घ्यावा, त्या म्हणाल्या.









