पालकमंत्र्यांनी घेतली विरोधी गटाच्या नगरसेवकांकडून माहिती : सत्ताधारी गटाला कोंडीत धरण्यासाठी पालकमंत्र्यांचे बारकाईने लक्ष
बेळगाव : महापालिकेमधील कारभाराबद्दल आता आक्रोश निर्माण होताना दिसत आहे. फाईल चोरी प्रकरणाबरोबरच 138 सफाई कर्मचाऱ्यांचे नियुक्ती प्रकरणही चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी विरोधी गटाच्या नगरसेवकांची बैठक घेऊन याबाबत संपूर्ण माहिती घेतली आहे. त्यामुळे आता सत्ताधारी गटाला कोंडीत धरण्यासाठी पालकमंत्र्यांनी जातीने लक्ष दिले आहे. पालकमंत्री सतीश जारकीहोळी हे महापालिकेमध्ये येणार आहेत, याची माहिती मिळताच विविध संघटनाही त्याठिकाणी दाखल झाल्या. त्यांनीही अनेक तक्रारी पालकमंत्र्यांकडे मांडल्या आहेत. महापालिकेतील अधिकाऱ्यांवर दबाव घातला जात आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्यावर आरोप करणाऱ्या सत्ताधारी गटाला हे प्रकरण चांगलेच शेकणार असल्याचे दिसू लागले आहे. पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि आमदार राजू सेठ यांनी महापालिकेतील नगरसेवकांकडून सर्व ती माहिती घेतली आहे. याबाबत सरकारकडे योग्य तो पाठपुरावा करणार असल्याचे नगरसेवकांना सांगण्यात आले आहे.
विरोधी गटाचे नेते मुजम्मील डोणी यांच्या कक्षात बैठक घेतली. यावेळी सत्ताधारी गटाकडून अधिकाऱ्यांवर कशाप्रकारे दबावतंत्र वापरले जात आहे, याची संपूर्ण माहिती देण्यात आली. याचबरोबर निधी देतानाही टाळाटाळ सुरू असल्याचा आरोप होत आहे. अधिकाऱ्यांवर विविध प्रश्नांचा भडिमार करून त्यांना काम करण्यापासून दूर ठेवले जात आहे. 138 कामगारांची नियुक्ती रितसर करण्यात आली नाही. त्याबद्दलही चौकशी करावी, अशी मागणी विरोधी गटाच्या नगरसेवकांनी केली आहे. या बैठकीला विरोधी गटनेते मुजम्मील डोणी, नगरसेवक अजिम पटवेगार, बाबाजान मतवाले, रवी साळुंखे, वैशाली भातकांडे, शिवाजी मंडोळकर, अफ्रोज मुल्ला, खुरशीद मुल्ला, ज्योती कडोलकर, शाहीद पठाण, रियाज किल्लेदार यांच्यासह इतर नगसेवक उपस्थित होते.