बेळगाव : महापालिकेतील अधिकाऱ्यांविरोधात तक्रार केल्यानंतर पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी महापालिका बरखास्त करू, असे पत्रकारांसमोर स्पष्ट केले आहे. त्यामुळे सभागृहामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सर्व नगरसेवकांना त्रास देण्याच्या उद्देशाने त्यांनी हे वक्तव्य केले असून या प्रकरणाबाबत चर्चा करण्यासाठी आम्हाला वेळ द्यावी, अशी तक्रारवजा विनंती महापौर शोभा सोमणाचे यांनी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. महापालिकेत शनिवार दि. 21 रोजी सर्वसाधारण सभा पार पडली. मालमत्ता कर वाढविला नाही म्हणून कारणे दाखवा नोटीस नगर प्रशासन संचालनालयाने महापालिकेला दिली. याप्रकरणी महापालिकेतील सत्ताधारी भाजप गटाने आयुक्त अशोक दुडगुंटी यांना लक्ष्य बनविले होते. त्यामुळे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी अधिकाऱ्यांना लक्ष्य बनविल्यास महापालिका बरखास्त केली जाईल, असे सांगितले होते. त्यानंतर महापौरांनी राज्यपालांकडे ही तक्रार केली आहे.
महापौर सोमणाचे यांनी मंगळवारी पाठविलेल्या पत्रामध्ये 21 ऑक्टोबर रोजी सर्वसाधारण सभेत आयुक्त अशोक दुडगुंटी यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी राज्यपाल, केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्याकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर नगर प्रशासन संचालनालय आणि इतर विभागांनी दोषी अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई करण्याची शिफारस करणारा ठरावही त्या सभेमध्ये मंजूर केला आहे, असे या पत्रामध्ये म्हटले आहे. या प्रकरणानंतर पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी अधिकाऱ्यांना त्रास दिला जात असेल तर महापालिका बरखास्त करू, असे वक्तव्य केले आहे. यामुळे 58 नगरसेवकांना तसेच बेळगावच्या 6 लाख जनतेला त्रास देण्याच्या हेतूने पालकमंत्र्यांनी हे वक्तव्य केल्याचेही या पत्रामध्ये म्हटले आहे. तेव्हा आम्ही 37 नगरसेवक या विषयाबाबत संपूर्ण माहिती देणार असून आम्हाला वेळ द्यावा, असे या पत्रामध्ये महापौरांनी म्हटले आहे.