जातीचे, भाषेचे राजकारण करण्याचा प्रयत्न
बेळगाव : कोणत्याही जाती, धर्माचे आणि भाषेचे राजकारण नाही तर भाजप आणि काँग्रेसमधील ही लढाई आहे. मात्र याला जातीचे, भाषेचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. महापालिकेमधील फाईल चोरीप्रकरण ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे आम्ही त्या विरोधात सरकारकडे चौकशी करण्याची मागणी करणार आहे. सर्वसाधारण सभेमध्ये केवळ एका तारखेवरुन अधिकाऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे चुकीचे आहे. तारीख चुकली असेल तर ती दुरुस्त करता येते. मात्र त्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव घालणे हे अत्यंत चुकीचे असून, त्याचे आत्मपरिक्षण सभागृहातील भाजपच्या नगरसेवकांनी करावे, असे सतीश जारकीहोळी यांनी पत्रकारांसमोर सांगितले.
त्रास देत असाल तर संबंधितांवर कारवाई
महापालिकेतील या घटनेला जाती, धर्माचा लेबल लावण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. मात्र तो योग्य नाही. आम्ही अधिकाऱ्यांना त्रास देवू नये. अधिकाऱ्यांकडून काम करून घ्यावे. मात्र अधिकाऱ्यांना त्रास देत असाल तर संबंधितांवर कारवाई करू, असे सांगितले आहे. कोणालाही गोवण्याचा प्रश्न येत नाही.अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा इतरांकडे तक्रार करणे योग्य आहे का? हा प्रश्न देखील यावेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी उपस्थित केला आहे.
कायद्याच्या चौकटीतच सर्व चौकशी करू
महापालिकेमध्ये 138 कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. ती बेकायदेशीर आहे. त्याबाबत आम्हीही सरकारला सर्व माहिती देणार असल्याचे स्पष्ट केले. महापौरांनी राज्यपालांना पत्र पाठविले आहे. याबाबत विचारले असता त्यांना जे करायचे आहे ते करू देत. आम्हालाही कोणालाही पत्र पाठविता येते, असे सांगत आम्ही कायद्याच्या चौकटीतच सर्व चौकशी सुरू करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. फाईल चोरीप्रकरणी खातेनिहाय चौकशी करून त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.









