खानापूर : येथील आपलं खानापूर न्यूज पोर्टलचे संपादक दिनकर मरगाळे यांना मंगळवारी रात्री मारहाण करण्यात आली होती. याबाबत मरगाळे यांनी खानापूर पोलीस स्थानकात मारहाण करणाऱ्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. खानापूर तालुका पत्रकार संघटनेच्यावतीने या घटनेचा निषेध करण्यात आला असून याबाबत पोलिसानी कठोर कारवाई करून पत्रकाराना न्याय देण्याच्या मागणीचे निवेदन पोलिसाना देण्यात आले. येथील आपलं खानापूर न्यू पोर्टलचे संपादक दिनकर मरगाळे हे अर्बन बँक चौक येथील दुर्गादेवीचे विसर्जन करण्यासाठी जात असताना मलप्रभा नदी घाटाजवळ काही तरुण या ठिकाणी येऊन मरगाळे यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ करू लागले. यानंतर अचानक अंगद कुंभार याने दिनकर मरगाळे यांना बेदम मारहाण केली. यात मरगाळे यांना चेहऱ्यावर आणि डोळ्यावर जबर मार लागला आहे. खाली पडल्यानंतर देखील लाथाबुक्क्यानी दिनकर यांना मारहाण करण्यात आली. यानंतर मष्णू उर्फ बन्सी कुंभार याने त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
तालुका पत्रकार संघटनेच्या बैठकीत निषेध
याबाबत दिनकर मरगाळे यांनी खानापूर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेबाबत खानापूर तालुका पत्रकार संघटनेने बैठक घेऊन निषेध केला. तसेच पत्रकारवरील हल्ल्याबाबत पोलिसानी कठोर कारवाई करावी, आणि शहरातील चोरी, गांजा, सट्टाबाजार, मटका यासह इतर अवैद्य धंद्यावर आळा बसवावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर पिराजी कुऱ्हाडे, वासुदेव चौगुले, विवेक गिरी, सुहास पाटील, हणमंत गुरव, प्रसन्न कुलकर्णी, शंकर देसूरकर, प्रल्हाद मादार यासह इतर पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.