विजयादशमीनिमित्त सकाळपासूनच मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी : पालखी मिरवणुकीनंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम : दुर्गामाता मूर्तीचे मिरवणुकीने रात्री विसर्जन
वार्ताहर /किणये
तालुक्यात विजयादशमीनिमित्त सीमोल्लंघन मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने पार पडला. मंगळवारी सकाळपासूनच विविध गावातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी झाली होती. मंदिरात पूजा-अर्चा करून गाऱ्हाणा व भजनांचे कार्यक्रम झाले. सायंकाळी प्रत्येक गावातील सीमेवर जाऊन ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने सीमोल्लंघन सोहळा साजरा केला व आपट्याची पाने वाटप करून ‘सोनं घ्या, सोन्यासारखे रहा,’ असे म्हणत एकमेकांच्या गाठीभेटी घेतल्या. नवरात्रीनिमित्त तालुक्यात नऊ दिवस विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम उत्साहाने झाले. काही मंदिरांमध्ये ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा आदी ग्रंथांचे वाचन करण्यात आले. पहाटे काकडारती, दुपारी हरिपाठ, भजन, प्रवचन असे दैनंदिन कार्यक्रम झाले. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
मंगळवारी दसरा विविध गावांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. तालुक्यात बहुतांश गावांमध्ये सिद्धेश्वर, कलमेश्वर, रामलिंगेश्वर, ब्रह्मलिंग आदी शिवस्वरुप मंदिरे आहेत. या मंदिरांमध्ये पालखी मिरवणूक काढण्यात आली. तसेच महालक्ष्मी मंदिरामध्ये नऊ दिवस देवीचा जागर करण्यात आला. यंदा पावसाने हुलकावणी दिली असल्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे.भातपिके पोसविण्याला आली आहेत. मात्र पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली आहे. किमान दसऱ्याच्या कालावधीत पाऊस पडेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. यावर्षी निसर्गाचे चक्र कसे काय बदलले याची चिंता शेतकऱ्यांना आहे. बेळगाव तालुका दुष्काळग्रस्त बनला आहे, अशी परिस्थिती असली तरी दसरा सणाच्या सर्व धार्मिक विधी शेतकऱ्यांनी अखंड जपल्या.
दांडिया-मनोरंजनाचे कार्यक्रम
काही गावातील सार्वजनिक मंडळांच्यावतीने दुर्गामाता मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आल्या होत्या.यानिमित्त रोज सायंकाळी महाआरती, दांडिया व मनोरंजन कार्यक्रम झाले. मंगळवारी सायंकाळी टाळ मृदंग व पारंपरिक वाद्यांच्या गजरात दुर्गामाता मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. बेळगुंदी भागात रवळनाथ पालखी मिरवणूक काढण्यात आली. मंगळवारी प्रारंभी रवळनाथ मंदिरात पूजा विधी कार्यक्रम झाला. त्यानंतर शिवाजीनगर येथील सीमेच्या ठिकाणी पालखीचे पूजन करण्यात आले. बिजगर्णी रोड हनुमाननगर, राकसकोप रोडमार्गे बेळगुंदी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून गावभर रवळनाथाच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली.
बेनकनहळ्ळीत विजयादशमी पारंपरिक पद्धतीने साजरी
बेनकनहळ्ळी गावात मंगळवारी विजयादशमी पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. गावातील हक्कदार पाटील यांच्या घरातून पालखी ब्रह्मलिंग मंदिराकडे नेण्यात आली. पालखीची मिरवणूक टाळ मृदंगाच्या गजरात काढण्यात आली. ब्रह्मलिंग मंदिरात पालखीचे विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांच्यावतीने गाऱ्हाणा कार्यक्रम झाला व ब्रह्मलिंग परिसरात सोने वाटपाचा कार्यक्रम झाला.
नावगे गावात पालखी मिरवणुकीला भाविकांची अलोट गर्दी
नावगे गावात विजयादशमी दिवशी पालखी मिरवणुकीला भाविकांची अलोट गर्दी होती. मंगळवारी दुपारी रामलिंग मंदिराशेजारील झाडाजवळ नारळ ठेवून बंदुकीने फोडण्यात आले. त्यानंतर रामलिंग व भैरदेव मंदिरात गाऱ्हाण्याचा कार्यक्रम झाला. रामलिंग मंदिराभोवती पाचवेळा पालखी प्रदक्षिणा झाली. पालखी फिरत असताना पालखीच्या खाली भाविक बसले होते. त्यानंतर सीमेवर जाऊन सीमोल्लंघन करण्यात आले.
वाघवडे गावात पारंपरिक पद्धतीने दसरोत्सव
वाघवडे गावात पारंपरिक पद्धतीने दसरोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संतिबस्तवाड, रणकुंडये, किणये, पिरनवाडी, खादरवाडी, मंडोळी, हंगरगा, सावगाव, बोकनूर, सोनोली, यळेबैल, राकसकोप, बेळवट्टी, बिजगर्णी, कावळेवाडी आदी गावात विजयादशमी उत्साहाने साजरी करण्यात आली.