कलमेश्वर गल्लीत शिवमूर्तीची प्रतिष्ठापना : जयघोषाने गावात चैतन्य
वार्ताहर /कंग्राळी बुद्रक
हर हर महादेव, दुर्गा माता की जय, श्री कलमेश्वर महाराज की, हिंदू राष्ट्र की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय… च्या जयघोषात कंग्राळी बुद्रुक गावचे जागृत ग्रामदैवत श्री कलमेश्वर मंदिरामध्ये सुरू असलेल्या नवरात्रोत्सवाची व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान धारकऱ्यांच्यावतीने सुरू असलेली दुर्गामाता दौडची विजयादशमी दिवशी मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली. विजयादशमी दिवशी तर संपूर्ण गावातील प्रत्येक गल्लीमध्ये रस्ते स्वच्छ करून रंगीबेरंगी रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या. संपूर्ण गावभर भगवे झेंडे व भगव्या पताका लावल्यामुळे सारे गाव शिवमय झाल्याचा भास होत होता. तत्पूर्वी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध पूजन करण्यात आले. यानंतर प्रेरणामंत्र व आरती म्हणून दुर्गामाता दौडला प्रारंभ करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना
विजयादशमी व दौडचे औचित्य साधून कलमेश्वर गल्लीतील शिवप्रेमीनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. सदर मूर्तीला व्यंकट पाटीलकडून 10 हजार, कल्लाप्पा तवनाप्पा पाटीलकडून 5 हजार तर शिवा कोळीकडून 2500 रुपये देणगी मिळाली. धारकरी संदीप पाटील यांनी नोव्हेंबर महिन्यात किल्ले रायगडवर राबविण्यात येणाऱ्या गडकोट मोहिमेमध्ये मोठ्या संख्येने धारकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी धनराज तळवार यांची मातृभाषा कन्नड असूनसुद्धा शिवाजी महाराजांच्या पराक्रमी आठवणी आपल्या बोबड्या मराठी भाषेमध्ये सांगून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ध्येयमंत्र व आरती म्हणून दौडची सांगता करण्यात आली. सूत्रसंचालन प्रशांत पवार व बसवंत पाटील यांनी केले.