वृत्तसंस्था / लंडन
युवा ग्रँडमास्टर डी. गुकेश आणि आर. प्रज्ञानंद हे वर्षातील सर्वांत मोठ्या फिडे ग्रँड स्विस खुल्या स्पर्धेतील भारतीय आव्हानाचे नेतृत्व करतील ही स्पर्धा बुधवारपासून सुरू झाली असून त्यातून कँडिडेट स्पर्धेसाठी दोन बुद्धिबळपटूंना पात्र ठरता येईल. या स्पर्धेत पाचवे मानांकन लाभलेला खेळाडू गुकेशवर पहिल्या दोन खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्याच्या दृष्टीने प्रज्ञानंदपेक्षा जास्त दबाव असेल. कारण तशी कामगिरी केल्यास त्याचे कँडिडेट्स स्पर्धेतील स्थान निश्चित होईल. कँडिडेट्स स्पर्धेतून जागतिक विजेता डिंग लिरेनचा आव्हानवीर ठरणार आहे.
विश्वचषकात मिळविलेल्या रौप्यपदकामुळे प्रज्ञानंद आधीच कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. 4 लाख 60 हजार डॉलर्सची (ऊ. 3.6 कोटींहून अधिक) एकूण बक्षिसे असलेल्या खुल्या विभागात उतरलेल्या 114 खेळाडूंपैकी 14 भारतीय खेळाडू आहेत. कोणत्याही एका देशाचे इतके खेळाडू स्पर्धेत सहभागी झालेले नाहीत. सहाव्या फेरीनंतर एक दिवस विश्रांती घेतली जाणार असून एकूण अकरा फेऱ्या होणार आहेत. अमेरिकी फॅबियानो काऊआना हा अव्वल मानांकित खेळाडू असून एकंदरित 106 ग्रँडमास्टर या स्पर्धेत खेळताना दिसतील.
कँडिडेट्स स्पर्धेत स्थान मिळविण्याच्या शर्यतीत अर्जुन एरिगेस हा अन्य एक भारतीयही असेल. पी. हरिकृष्ण आणि विदित गुजराथी या भारतीयांच्या मागे अर्जुनला 16 वे मानांकन प्राप्त झाले आहे. त्याशिवाय निहाल सरिन, एस. एल नारायणन, अरविंद चिदंबरम, रौनक साधवानी, आर्यन चोप्रा, लिओन ल्यूक मेंडोन्सा, मुरली कार्तिकेयन, अभिजित गुप्ता आणि बी. अधिबान हेही अन्य आरतीय खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसतील. महिलांच्या स्पर्धेसाठी 1 लाख 40 हजार डॉलर्सची (ऊ. एक कोटींहून अधिक) एकूण बक्षिसे ठेवण्यात आली असून यात ग्रँडमास्टर डी. हरिका ही सातवे मानांकन लाभलेली खेळाडू आहे. प्रज्ञानंदची बहीण आर. वैशाली, वंतिका अग्रवाल, दिव्या देशमुख, बी. सविताश्री आणि तानिया सचदेव या सदर स्पर्धेत उतरलेल्या अन्य बुद्धिबळपटू आहेत.









